सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : वेळ दुपारी दीडची.. ठिकाण इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार.. अचानक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी या बाजार समितीमध्ये प्रवेश करतात बाजार समितीच्या सचिवांशी चर्चा करतात आणि त्यानंतर सुरू होते मक्याच्या मॉइश्चरायझर तपासणीच्या मशीनची तपासणी..!
शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग रायते, हरिदास पवार, मंगेश घाडगे, दादा किरकत, श्री तावरे, सचिन कोथमिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आज बाजार समितीत आले होते. गेल्या काही दिवसांपासून मक्याची खरेदी आधारभूत किमती पेक्षा कमी होत असल्याची त्यांची तक्रार होती.
त्याचप्रमाणे मक्याची खरेदी करताना मक्याची आर्द्रता ही कमी व जास्त तफावतीची दाखवून त्याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची देखील त्यांची तक्रार होती. सचिव श्री दोशी यांना घेऊन हे सर्व पदाधिकारी थेट मका खरेदी करणाऱ्या आडत्यांकडे पोहोचले आणि एका पाठोपाठ एक अशा आडत्यांच्या मशीनची तपासणी करण्यास सुरुवात केली.
यामध्ये सर्वच मशीनमध्ये तफावत आढळून आली. एका ठिकाणची मका घेऊन प्रत्येक आडत्याच्या दुकानात नेऊन त्याद्वारे मक्याची आर्द्रता तपासण्यात आल्याने त्यातील फोलपणा लक्षात आला. त्यानंतर बाजार समितीचे सचिव श्री दोशी यांनी या मशीन्स मधील वेगवेगळी येणारी टक्केवारी लक्षात घेत या पुढील काळात सुधारणा करण्याचे आश्वासन शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले, तसेच किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने जिथे खरेदी झाली असेल तिथे संबंधित व्यापाऱ्यांना नोटीसा बजावल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले.
काही दिवस वाट पाहू, पुन्हा आंदोलन करणार!
दरम्यान या संदर्भात पांडुरंग रायते यांनी पत्रकारांना सांगितले की, गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. मशीनद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची माहिती आमच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मिळाल्याने आम्ही आज बाजार समितीत जाऊन प्रत्यक्ष तपासणी केली, तेव्हा या मशीन सदोष असल्याचे दिसून आले. आम्हाला आता आश्वासन मिळाले आहे परंतु यामध्ये खरोखर सुधारणा झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू