राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : कर्नाटकच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत चांगल्या चांगल्या मातब्बर भाजपच्या मंत्र्यांना घरी बसवले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ५० खोके वाल्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम राबवावा असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे सोमवारी (दि २२) दौंड दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी गाव भेट घेत शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित नागरिकांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कर्नाटक राज्यात काँग्रेस सरकार बहुमताने आले तेथील जनतेने एक वर्षापासून ठरवले होते. मतदानातून कर्नाटकच्या जनतेने भाजप सरकारला घरी बसवले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील जनतेनेही ५० खोकेवाले आणि अन्याय करणारे सरकार घरी बसवावे.
भाजप सरकार सध्या ईडी आणि सीबीआय मार्फत विरोधकांवर अन्याय करत आहे. अनिल देशमुख यांच्या घरावर नऊ वेळा छापे टाकले,जयंत पाटील यांनाही ईडीने नोटीस बजावली मात्र भाजपमधील मंत्र्यांनी आमदारांना काहीच केले जात नाही म्हणून तर भाजपमधील लोकं बोलतात भाजपमध्ये असल्यामुळे आम्हाला शांत झोप लागते, याचा अर्थ काय? हे ईडी आणि सीबीआयचे सरकार आहे अशी टीका सुळे यांनी केली.
दोन हजार रुपयांची नोट बंद करायची होती, तर ती आणलीच कशाला? असाच सवाल करीत केंद्र सरकारवर टीका केली. भ्रष्टाचार कमी करायचा आहे दोन हजार रुपयांची नोटा छापल्या आणि आता नोटा जास्त झाल्यात म्हणून त्या बंद केल्या. सात वर्षात दोन हजाराच्या नोटा नेमका कुठे कुठे गेल्या ? त्या नोटा ५० खोक्यात वापरले तर नाही ना ? असा चिमटा खासदार सुळे यांनी भाजप सरकारला नोटबंदीवरुन घेतला.
२०१४ साली भाजप सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटवले होते. पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन खुद्द देवेंद्र फडणीस यांनी दिले होते. त्या आरक्षणाचा पुढे काय झाले मिळाले का धनगर समाजाला आरक्षण? मुळात भाजप हेच आरक्षण विरोधी आहे.
भाजपमध्ये दोन गट आहेत. एक गटाला आरक्षण पाहिजे आहे तर एक गटाचा आरक्षणाला विरोध आहे. आरक्षणावरून खासदार सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका केंव्हाही लागू शकतात. तेंव्हा तयारीला लागा असा सल्लाही खासदार सुळे यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला. याप्रसंगी माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, रामभाऊ टुले,प्रशांत शितोळे, आशा शितोळे, स्वाती गावडे, नितीन शितोळे, शिवाजी ढमाले, जुनेद तांबोळी, विकास खळदकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.