पोलीस निवांत पगार घेतील,तुम्हाला तर मी सॅल्यूटच करतो.अजित पवार यांनी भरसभेत दारूबंदीवरून पोलीस यंत्रणेला सुनावले.
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. सकाळपासूनच त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर पाहुणेवाडी येथील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
त्यावेळी भाषण करत असताना अजित पवार यांना पाहुणेवाडी येथील ग्रामस्थांनी दारूबंदीबाबत एक पत्र दिले. अजित पवार यांनी हे पत्र भर सभेत वाचून दाखवले. ते म्हणाले,पाहूणेवाडी गावातील दारूबंदी करा.आता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार येतो आणि कुठं कुठं दारूच्या भट्ट्या आहेत ते शोधत बसतो. पोलिस निवांत पगार घेतील.तुम्हाला तर मी सॅल्यूटच करतो.मी कितीतरी वेळा सांगतो माझा यामध्ये काही हस्तक्षेप नसतो,असे अजित पवार म्हणाले.
पाहुणेवाडी ग्रामपंचायत हद्दीत गावठी हातभट्टी निर्मिती दारूविक्री रात्रं-दिवस उघडपणे चालू आहे.मोठ्या प्रमाणात इतर शेजारी चार गावात दारूची विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे. पाहूणेवाडी गावठाण तसेच वस्ती वाड्यावर गोरगरिबांचे प्रपंच उध्वस्त झालेत.दारू पिणाऱ्यांमुळे गावातील इतर लोकांना विनाकारणपणे त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे गावात विनाकारण तंटे निर्माण होतात.
पुणे ग्रामीण व माळेगाव पोलीस ठाण्यांना दारुबंदी होण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. परंतु आजपर्यंत दारू बंद झाली नाही. मात्र त्यांनी याची दखल घेतली नाही, असे त्या पत्रात नमूद केले आहे. यावेळी अजित पवार यांनी ग्रामस्थांच्या मागणीचे पत्र पोलीस अधिकाऱ्यांच्या हातात देत सह्यांचा कागद मात्र मी माझ्याकडे ठेवतो. सह्या गावच्या आहेत. नाहीतर हे पत्र मला कोणी दिलं, त्यांच्या मागे तुम्ही लागाल असे म्हणत त्यांनी पोलिसांनाच धारेवर धरले.
अजित पवार पुढे म्हणाले,माझी तुम्हाला विनंती आहे पुढच्या वेळी कोणी पाहुणेवाडीच मला कोण भेटल तर त्यानी कृपया मला सांगावं की, दादा तुम्ही सांगितल्यानंतर पोलिसांनी दारुबंदीसाठी पावले उचलली. उद्या माझी जरी भट्टी असली, तर मलासुद्धा टायरमध्ये घाला,अशा शब्दात अजित पवारांनी पोलीस यंत्रणेला भर सभेत सुनावले.