इंदापूर तालुक्यातील तरुणाईचा गुन्हेगारीकडे कल..? पळसदेवच्या दोन तरुणांनी एक पिस्तूल व एक काडतूस विक्रीस आणले.. दोघांना ठोकल्या बेड्या..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. तरुणाईने आता पिस्तुलाकडे आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यातच बेकायदेशीर विना परवाना पिस्तूल बाळगलेल्या काटी गावच्या युवकावर गुन्हा दाखल होतोय ना तोच पळसदेव मध्ये दुसरी घटना घडली.
पळसदेव मधील दोन युवक पिस्तूल विक्रीसाठी एका ठिकाणी येणार असल्याची खबर इंदापूरच्या गुन्हे शोध पथकास मिळताच त्यांनी पळसदेव भागात सापळा लावला. पोलिसांचा कटाक्ष नजरेतून ते सुटले नाहीत. दोघा युवकांच्या मुसक्या आवळून, त्यांच्याकडून एक पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले..
दिवसेंदिवस इंदापूर तालुक्यात तरुणाईतील वाढत चाललेली गुन्हेगारी व तिचा बिमोड करण्यासाठी इंदापूर पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे. पिस्तूल विक्रीसाठी आणणाऱ्या माउली मोहन फुले (वय २२) व प्रविण मल्हारी शिंदे (वय २७ ) दोघेही राहणार पळसदेव , तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की, शनिवारी (दिनांक 20 मे ) रोजी दुपारनंतर पावणे पाच वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या हॉटेल गोवर्धन येथे बायपास जवळ दोघेजण पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर इंदापूर पोलिसांना मिळाली. तात्काळ इंदापूर पोलिसांचे गुन्हे शोध पथक पळसदेव कडे मार्गस्थ झाले.
संबंधित ठिकाणी पोलिसांनी ट्रॅप लावला. पोलिसांच्या नजरेने त्या दोघांना हेरले. यावेळी माउली फुले व प्रविण शिंदे यास पोलीस आल्याची चाहूल लागताच ते तेथून पळून जावू लागले. पण इंदापूरच्या पोलिसांसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. पोलिसांनी त्यांच्या तिथेच जायबंद केले. दोन पंचांसमक्ष त्यांची अंग झडती घेतली असता प्रवीण शिंदे याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व त्यामध्ये एक जिवंत काडतुस बेकायदेशीर, विना परवाना हे अग्नी शस्त्र त्यांच्या जवळ मिळाले. त्यांच्यावर भारतीय हत्यारे कायदा कलम 5 (25) प्रमाणे कायदेशीर गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींना काल रविवारी इंदापूर कोर्टासमोर हजर केले. पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश माने करत आहेत. सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार प्रकाश माने, ज्ञानेश्वर जाधव, सचिन बोराडे, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, विनोद लोखंडे, गजानन वानूळे, गणेश डेरे, अकबर शेख, होमगार्ड संग्राम माने यांनी केली.