बारामती : महान्यूज लाईव्ह
छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र अर्थात रामभाऊ बलवंड (वय ६५ वर्षे) यांनी आज पुण्यातील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे ते निकटचे सहकारी होते.
काटेवाडी नजीकच्या खताळपट्टा येथील रहिवासी असलेले रामचंद्र बलवंड हे भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे सन 1992 ते 1997 या काळात संचालक होते. आपल्या नर्मविनोदी शैलीमुळे रामभाऊ बलवंड हे परिसरात सुपरिचित होते. सोनेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच छत्रपती शिक्षण संस्थेचे देखील सदस्यपद त्यांनी भूषवले होते.
रामभाऊ बलवंड हे अजित पवार यांचे निकटचे सहकारी होते. खुद्द अजितदादांनी देखील अनेकदा त्यांच्या या मैत्रीचा किस्सा अनेकदा सांगितला. अजित पवार राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा भाषण करायचे, तेव्हा पुढे जनसमुदाय पाहून तेही काही काळ थांबायचे.
अशावेळी रामभाऊ बलवंड यांनी दादा, झाडांकडे पहा.. पानांकडे पहा.. अगदी आमच्याकडे पाहूच नका, पण बिनधास्त बोला असे सांगत त्यांना आधार द्यायचे, अशी आठवण खुद्द अजित पवार यांनी देखील अनेकदा सांगितली. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी देखील रामभाऊ बलवंड यांच्या आठवणी सांगितल्या. बलवंड यांच्यावर उपचार सुरू होते, तेव्हा खुद्द अजित पवार हे देखील या उपचारावर लक्ष ठेवून होते.
आज पुण्यातील दवाखान्यात रामभाऊ बलवंड यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी त्यांचा अंत्यविधी खताळपट्टा येथे होणार असून त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.