दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंडमध्ये सध्या सत्तेचा प्रचंड गैरवापर सुरू आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे, अन्याय करणाऱ्या आणि गुन्हेगारी आरोपींना न्यायालयाचे आदेश येऊनही अटक केली जात नाही. पोलिसांवर सत्ताधारी आमदार राहुल कुल यांचा प्रचंड दबाव आहे. असा खळबळजनक आरोप माजी आमदार रमेश थोरात यांनी केला.
दौंडच्या माजी नगराध्यक्षांच्या कुटुंबावर २० ऑक्टोबर २०२२ रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यावेळी महिलांचा विनयभंग ही करण्यात आल्याची तक्रार दौंड पोलीसांकडे करण्यात आली होती, मात्र दौंड पोलिसांनी तक्रार दाखल न केल्याने पिढीतांनी दौंड न्यायालयात धाव घेतली. सहा महिन्यांनंतर न्यायालयाने वीस आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दौंड पोलिसांना दिले.
त्यानंतर गुन्हे दाखल होऊनही अद्याप आरोपींना अटक केली गेली नाही. याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि १९) दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली दौंड पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपस्थित आंदोलकांना मार्गदर्शन करताना रमेश थोरात म्हणाले की, बादशाह शेख यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला,. शहरातील वीस जणांवर कोर्टाच्या आदेशाने जीवघेणे हल्ला करणे व विनयभंगाचा गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र संबंधित संशयित आरोपींना अटक ही केले जात नाही,
या आरोपींना नेमके कोणाचे अभय आहे? दौंड तालुक्यात सध्या सत्तेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. आमदारांचा पोलीस प्रशासनावर दबाव आहे. विरोधी गटांच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. सत्ताधारी आमदारांकडून पोलीस प्रशासन व इतर शासकीय अधिकाऱ्यांचा पाहिजे तसा वापर करून घेतला जात आहे. माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांना राजस्थानातून अटक केली जाते, मात्र पोलीस स्टेशनच्या आवारात फिरणाऱ्या आरोपींना अटक होत नाही.
पोलिसांच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासनाने असे प्रकार त्वरित थांबवावेत आणि विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक करावी, अन्यथा भविष्यात यापेक्षा दहा पट मोठा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ही माजी आमदार थोरात यांनी यावेळी बोलताना पोलीस प्रशासनाला दिला.
या मोर्चात माजी आमदार रमेश थोरात, दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्यानेत्या वैशाली नागवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, दौंडचे माजी नगरसेवक आबासाहेब वाघमारे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड, राहुल मखरे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फय्याज शेख, नितीन दोरगे, सोहेल खान, गुरुमुख नारंग, संभाजी ताकवणे, दिपक सोनवणे यांच्यासह दौंड शहरातील व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चात लहान मुले आणि महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.