संदीप मापारी पाटील, बुलढाणा
शासनाने वाळूचे दर कमी करताच आणि सरकारी दराने सरकारी डेपोवर वाळू देणार असल्याचे जाहीर केल्यानंतरही वाळू माफिया थांबायला तयार नाहीत. मात्र लोणार तालुक्यात तहसीलदार गिरीश जोशी यांनी वाळू माफियांना चांगला दणका दिला.
तहसीलदार गिरीश जोशी यांचे फिरते रात्रगस्त पथक तालुक्यातील भुमराळा, सावरगाव तेली, वझर आघाव या गावाच्या परिसरात फिरले. या परिसराला पूर्णा नदी काठ लाभलेला असल्यामुळे पूर्णा नदीतील रेती परिसरातील गावामध्ये रेती माफियांचे अवैध रेती साठे आढळून आले.
तहसीलदार गिरीश जोशी यांनी या अवैध रेती साठ्यावर छापे टाकून वझर आघाव च्या परिसरातील रेती जप्त करून सदर रेती शासनाच्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पंचायत समिती लोणारमार्फत वाटप करण्यात आली.
ही कायर्वाही केल्यानंतर दिवसा बैठेपथक आणि रात्रीच्या वेळी फिरते पथक नेमणूक केली. त्यामुळे तालूक्यातील रेतीमाफियाचे तसेच रेती वाहतूक करणारे वाहनचालक, मालक धाबे दणाणले आहे. या पथकामध्ये तीन तलाठी, एक मंडळ अधिकारी आणि एक नायब तहसीलदार असून वेगवेगळी चार पथके तयार करून स्वत: तहसीलदार जोशी सुद्धा रात्रीला रेती चोरीला आळा घालण्यासाठी फिरत आहेत.