राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : पुणे येथील एका व्यवसायिकाला पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सोलापूर येथील बनावट बोगस पत्रकार व त्याच्या भावावर पाटस येथे पोलिसांवर गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश सौदागर हनमे (वय ४७) , दिनेश सौदागर हनमे (वय ४४, दोघेही रा.राजेश्वरीनगर,बोळे, उत्तर सोलापूर जि.सोलापुर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे येथील चंदननगर पोलीस स्टेशन मध्ये महेश हनमे याच्यावर कलम ३८६ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता.
एका आयटी कंपनीच्या व्यवसायिकाला या हनमे याने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. दरम्यानच्या काळात व्यावसायिकाने पाच लाख रुपये त्याला दिले होते, मात्र आता कसल्याही परिस्थितीत पन्नास लाख रुपये द्या अशी धमकी त्याने त्या संबंधित व्यवसायिकाला दिली होती, त्यावरून व्यवसायिकाने गुन्हा दाखल केला आणि पोलीस हनमे याच्या पाळतीवर होते.
महेश हनमे याला अटक करण्यासाठी पुणे येथील खंडणी विरोधी पोलीस पथकाने त्याच्या गाडीचा पाठलाग केला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलनाक्यापासून अंदाजे पाचशे मीटर अंतरावर या आरोपींची गाडी थांबवण्याचा प्रयत्न या पोलीस पथकाने केला. मात्र त्यांनी पोलिसांवर दगडाने व हाताने मारहाण करून फोर्ड फिएस्टा गाडी (नंबर एम एच 14 बीके 44 84 ) खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर घातली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
अशी फिर्याद पोलीस हवालदार सुरेंद्र दिलीप जगदाळे यांनी यवत पोलीस ठाण्यात दिल्याने या दोघांवर सरकारी कामात अडथळा आणणे व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.