वयाच्या 99 व्या वर्षी आपल्यातून गेलेले श्री लक्ष्मण केवटे कोण आहेत? त्यांचा इतिहास आपल्यासाठी का महत्वाचा?

डॉ संजय मंगेश सावंत, मुर्टी, बारामती.(9822012730)

वयाच्या 99 व्या वर्षी श्री लक्ष्मण केवटे यांचे निधन झाले , तुम्ही विचाराल कोण हे केवटे ? त्यांची काय विशेष कामगिरी ? तर श्री केवटे हे तुमच्या आमच्या सर्वांच्या जिव्हाळ्याची अशी ही एस टी म्हणजेच लालपरी तिचे पहिले वाहक !

एक जून 1948 रोजी एस टी नगर ते पुणे या मार्गावर पहिल्यांदा धावली , या एसटीचे पहिले वाहक होते श्री केवटे तर चालक होते किसन राऊत! दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील. दोघांनाही पगार होता महिना 80 रुपये आणि नगर ते पुणे एसटी प्रवासाचे भाडे होते दोन रुपये पन्नास पैसे! एक जून 1948 ला श्री केवटे यांनी एसटीचे वाहक पद स्वीकारले ते 1985 पर्यंत !

एसटीच्या पूर्ण इतिहासाचे साक्षीदार असलेले केवटे काही दिवसांनी शंभरी पूर्ण करणार होते तर एसटी एक जून 2023 रोजी आपली पंचाहत्तरी पूर्ण करणार होती परंतु एसटीच्या या सोहळ्याला दुर्दैवाने श्री केवटे हजर असणार नाहीत !

एसटी महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांमध्ये वाहक चालकांमध्ये श्री केवटे यांच्याबद्दल अत्यंत आदराची भावना होती. मागच्या वर्षी एक जून 2022 रोजी पहिली इलेक्ट्रिक बसदेखील अहमदनगर पुणे मार्गावर धावली व या सोहळ्याचे उद्घाटन देखील श्री केवटे यांच्या हस्ते झाले होते !

एसटी बद्दल आपणा सर्वांमध्येच एक जिव्हाळ्याचे व आपुलकीचे नाते आहे , एसटी हे एक सर्वात सुरक्षित प्रवासाचे माध्यम समजले जाते सर्व प्रवासी वाहनांमध्ये एसटीचे अपघात हे सर्वात कमी असतात व इतर अपघातांच्या तुलनेने जीवितहानी देखील कमी असते , आता प्रत्येकाच्या घरी चार चाकी वाहने आली आहेत व एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच कमी झाली आहे परंतु आमच्या लहानपणी एसटीचे सर्वांनाच प्रचंड आकर्षण असायचे !

पूर्वी प्रवास दूरचा असो वा जवळचा , आपण एसटीमध्ये स्थानपन्न झाल्यावर शेजाऱ्याचा पहिला प्रश्न कुठे जायचंय? या प्रश्नाने सुरू होऊन उतरताना या कधी आमच्या गावाला आला तर या! अशा वाक्याने संपायचा ! प्रवास सुरू होऊन संपेपर्यंत सहप्रवाशाशी स्वतःच्या शारीरिक व्याधी पासून सुरू झालेल्या गप्पा दिल्लीतील राजकारणापर्यंत जाऊन संपायच्या !

गंमत म्हणजे माझ्याकडे अगदी सातारा सांगली कोल्हापूर नगर जिल्ह्यातून पेशंट येतात ते पेशंट कोणी डॉक्टर्स पाठवीत नाहीत तर एसटीतील प्रवासी पाठवतात. सहप्रवाशाने आपली व्याधी सांगायला सुरुवात केली की, दुसरा प्रवासी म्हणणार तुम्ही इकडे तिकडे फिरू नका, सरळ मूर्टीला डॉक्टर सावंत यांच्याकडे जा, नक्की फरक पडेल. या लालपरीने आतापर्यंत मला हजारो पेशंट पुरवले आहेत !

आम्ही लहान असताना डॉक्टरपेक्षा कंडक्टरचं आकर्षण जास्त असायचं, कारण चालक व वाहकाचा रुबाब काही औरच असायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही मुंबईला मावशी व मामाकडे जायचो. बरेचदा रात्रीचा प्रवास देखील व्हायचा. त्या एसटीला रातराणी म्हणायचे. संध्याकाळच्या सुमारास ही गाडी सुटायची व पहाटे मुंबईला पोहोचायची.

सर्वांची तिकिटे काढून झाल्यानंतर कंडक्टर कधी पिवळ्या लाईट बंद करतोय व दोन निळ्या लाईट लावतोय याचेच आम्हाला आकर्षण असायचे. लोकांना झोप यावी म्हणून मोठ्या पिवळ्या लाईट बंद करून कंडक्टर निळ्या लाईट लावायचा बराच काळ आम्ही न झोपता त्या निळ्या लाईट कडेच बघत बसायचो,
सध्या जीवन इतकं असुरक्षित झालं आहे की, स्वतःच्या कारमध्ये देखील सुरक्षित वाटत नाही, परंतु त्याकाळी एसटीमध्ये ड्रायव्हर वर विश्वास ठेवून लोक निश्चिंतपणे झोपायची !

एसटीपुराण चालू आहे, म्हणून एक गोष्ट आठवली! मी चौथीत असताना आमच्या आई व दादांबरोबर आमच्या मूळ गावी कोकणात गेलो होतो. कणकवली मधून एसटीत बसल्यावर सातारला उतरलो. फलाटावर सातारा नीरा गाडी नुकतीच लागली होती, ती बघून खूप आनंद झाला आम्ही निरे पर्यंतचे तिकीट काढले. साताऱ्यामध्येच आम्हाला सहा वाजले होते.

गाडी साडेसहा वाजता सुटली. परंतु टेन्शन इथून पुढेच सुरू झाले कारण निरे तून आमच्या मूर्टी जायला शेवटची भोर मूर्टी मुक्कामी गाडी रात्री आठ वाजता होती ती गाडी चुकली असती तर रात्रभर स्टॅण्डवर थांबावे लागले असते. अर्थात ती मुक्कामी गाडी आम्हाला मिळणे शक्यच नव्हते, कारण नीरेला पोहोचेपर्यंत साडे नऊ वाजले होते.

निरेमध्ये जवळचे कोणी ओळखीचे देखील नव्हते की, ज्याच्याकडे मुक्काम करता येईल, त्यामुळे संपूर्ण रात्र बसून काढावी लागेल हे आम्ही गृहीत धरूनच होतो. साडेनऊ वाजता आमची गाडी निरेच्या एसटी स्टँड मध्ये शिरली. एसटीतून खाली उतरताच सहज चौकशी म्हणून वडील कंट्रोलर कडे गेले व म्हणाले भोर मुर्टी गाडी किती वाजता गेली ? यावर कंट्रोलर आम्हा सर्वांकडे बघत हसत म्हणाले, तुम्ही नशीबवान आहात. गाडी दीड तास लेट झाली आहे व फलाटावर लागलेली आहे. ताबडतोब तुम्ही जाऊन बसा. त्यावेळी आम्हा सर्वांना झालेला आनंद हा निव्वळ- अवर्णनीय ! कुठे गावाला जायचे असेल तर गाडी लेट असेल तर आपण मनातल्या मनात गाडीला शिव्या देत बसतो, परंतु त्या दिवशी आम्ही गाडी लेट झाल्यामुळे ड्रायव्हर – कंडक्टर व एसटी सर्वांचे मनातल्या मनात आभार मानत होतो !

Maha News Live

Recent Posts

ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह वाई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या…

5 hours ago

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीत..!

बारामती : महान्यूज लाईव्ह उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी विकास कामांची…

21 hours ago