शिरूर : महान्यूज लाइव्ह
जिद्द अन् चिकाटी च्या जोरावर यश मिळवत शिरूर येथील मंजिरी ने पोलिस व्हायचे दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. लेकीने मिळवलेल्या यशाची वार्ता कळताच आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.
ही जिद्दीची कहाणी आहे..शिरूर येथील मंजिरी कोळपे हीची.! मंजिरी हिचे प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. त्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण न्यु इंग्लिश स्कूल रयत संस्था शिरूर व ११ वी ते बी कॉम पर्यंत चे उच्च शिक्षण सी टी बोरा महाविद्यालय येथे झाले. शिक्षण घेत असतानाच पोलिस भरतीचे वेड लागल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
शिरूर येथील श्लोक करिअर अकॅडमी येथे पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण घेतले. दरम्यान महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच एन सी सी चे ही प्रशिक्षण पूर्ण केले.नुकत्याच झालेल्या महा पोलिस भरतीत परीक्षा देत मंजिरी ने उज्ज्वल यश प्राप्त करत मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे.
या यशाबद्दल बोलताना मंजिरी ने सांगितले की, सन २०१६ मध्ये वडिलांचे निधन झाले.त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशाही परिस्थितीत आई ज्योती व आजी गीताबाई यांनी लेकीला शिकवायचे व मोठे करायचे हे ठरवले होते. मी पोलिस व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. यासाठी मी कठोर मेहनत घेतली आणि स्वप्न सत्यात उतरवले.
या यशात कुटुंबातील आई, आजी,भाऊ, मामा तसेच शिक्षक अविनाश परांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. भविष्यात मोठ्या पदावर जायचे स्वप्न असल्याचे मंजिरी ने महान्यूज शी बोलताना सांगितले.