शिरूर : महान्यूज लाइव्ह
प्राईम टाईम शो मिळत नसल्याने चित्रपटगृहांनी अन्याय केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित टीडीएम या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले होते.मात्र पुन्हा लवकरच हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
ख्वाडा, बबन असे यशस्वी चित्रपट निर्माण केलेल्या भाऊराव कऱ्हाडे यांच्या टीडीएम हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र या चित्रपटास मिळालेले कमी शो, प्राईम टाईम न देणे या कारणामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ही सगळीकडे शो थांबविण्यात आले होते.
अत्यंत अडचणीतून चित्रपट निर्मिती करून अन्याय झाल्याने भाऊराव कऱ्हाडे यांना सर्व क्षेत्रातून मोठा पाठिंबा देण्यात आला.अनेकांनी मोर्चे,आंदोलने करत अन्यायाविरोधात आवाज उठविला होता. अखेर भाऊराव कऱ्हाडे यांनी फेसबुक लाईव्ह करत हा चित्रपट ९ जून रोजी सर्वत्र पुन्हा प्रदर्शित करत असल्याची माहिती दिली.
यावेळी त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत कलाकाराला मायेची प्रेमाची गरज असते, दिलेल्या पाठिंब्याबाबत सर्वांचा ऋणी आहे असे म्हणत पुन्हा नवी उमेद मिळाली असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.