विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
माळेगावच्या अव्दैत भोसले याने एनडीए ( आर्मी टेक्निकल इंन्ट्री स्कीम ४९ ) परीक्षेत देशपातळीवर तिसरा रॅंक मिळवून बारामती आणि राज्याचे नाव उंचावले आहे. कोरोनाच्या अत्यंत प्रतिकुल काळात आचार्य अकॅडमीने विशेष वर्ग सुरु केल्यामुळे हे यश मिळाल्याचे अव्दैत आणि त्याच्या पालकांनी सांगितले.
अव्दैत हा साताराच्या सैनिक शाळेमध्ये शिकत होता. परंतू कोरोनामुळे सैनिकी शाळा बंद झाल्याने त्याला घरी यावे लागले. एनडीएची परिक्षा अवघ्या चार ते पाच महिन्यावर आली असताना लष्करामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न असलेल्या अव्दैतच्या करियरपुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
यावेळी अव्दैतच्या वडिलांनी केलेल्या आग्रहामुळे आचार्य अकॅडमीने अवघ्या सात विद्यार्थ्यांसाठी एनडीए परिक्षेच्या तयारीसाठी ऑफलाईन वर्ग सुरु केला. या विद्यार्थ्यांमधील ५ विद्यार्थ्यांनी एनडीए तसेच युपीएससी परिक्षेत उज्जल यश संपादन केले आहे. यापैकी अव्दैतने देशपातळीवर ३ रा रॅंक मिळवून सर्वोच्च यश मिळवले आहे. याअगोदर प्रज्वल राऊत याने देशात ६ वा रँक मिळवला आहे.
अव्दैतने २०२१ साली प्रथम ही परीक्षा दिली. लेखी परीक्षा पास झाला तरी नंतरच्या मुलाखतीच्या सत्रामध्ये त्याला अपयश आले. त्याने पुढच्या वर्षी पुन्हा ही परीक्षा दिली. याच प्रयत्नात त्याने हे यश मिळवले आहे. अद्वैतच्या या यशाचे श्रेय आचार्य अकॅडमीच्या सर्व प्राध्यापकांनाही जाते असे यावेळी पालकांनी नमूद केले
पुढच्या एक वर्षात प्रशिक्षण पुर्ण करून अव्दैत लष्करात लेफ्टनंट पदावर क्लास वन अधिकारी म्हणून कामास सुरुवात करणार आहे. आचार्य अकॅडमीचे संस्थापक प्रा. ज्ञानेश्वर मुटकुळे, सुमीत शिणगारे, प्रवीण ढवळे व कमलाकर टेकावडे यांच्यासह सर्वांनी अव्दैतचे अभिनंदन केले आहे.