विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सुनिल वसंतराव पवार यांची तर उपसभापती पदी निलेश भगवान लडकत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निमित्ताने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची या पदावर वर्णी लावल्याने निष्ठेला आणि अभ्यासाला फळ मिळाल्याचे मानले जात आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीअगोदर विरोधी पक्षनेते व अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापतीपदी सुनिल वसंतराव पवार यांची तर उपसभापती पदी निलेश भगवान लडकत यांची नावे जाहीर केली. यानंतर संचालक मंडळाच्या प्रत्यक्ष निवड बैठकीत याच नावावर सर्व संचालकांनी एकमताने शिक्कामोर्तब केले.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टंकसाळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यध्यक्ष धनवान वदक, दूध संघाचे चेअरमन संदिप जगताप, बारामती खरेदी विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रय आवळे,लक्ष्मण मोरे, नारायणराव कोळेकर, तुषार कोकरे, सुनिल बनसोडे, दिलीप परकाळे, विलास कदम, संभाजी किर्वे, सूर्यकांत गादीया व सर्व संचालक उपस्थित होते.
यापूर्वीही बाजार समितीचे संचालक असलेल्या सुनील पवार यांचा शेती आणि शेतीपूरक व्यवसायात असलेला अभ्यास तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विविध निवडणुकांसाठी त्यांनी केलेली व्यूहरचना यामुळे ते तालुक्यात सुपरीचित आहेत. माळेगाव खुर्द येथील रहिवासी असलेले सुनील पवार हे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या मध्यवर्ती विज्ञान केंद्राचे यापूर्वी संचालक व सध्या पदाधिकारी आहेत.
दुसरीकडे बाबुर्डी शेरेवाडी चे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते निलेश लडकत यांची उपसभापती पदी वर्णी लागल्याने सामान्य व निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षांमध्ये किती महत्त्व आहे, याची देखील प्रचिती आणि निमित्ताने दाखवून देण्यात आली आहे.