दौंड : महान्यूज लाईव्ह
भीमा सहकारी साखर कारखाना तथा निराणी ग्रुप शुगर कारखान्यावरील झालेला कथित घोटाळा कागदपत्राच्या पुराव्यानिशी सिद्ध करणार आहे. या घोटाळ्यांचा पर्दाफाश करणारच आहे. त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांना दिला आहे.
दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कथित पाचशे कोटींच्या घोटाळ्यांचे प्रकरण सध्या थांबायचे नाव घेत नाही. भाजपचे आमदार आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांना भाजपचेच माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी भष्टाचाराच्या आरोपावरून सातत्याने घेरत आहेत.
खासदार संजय राऊत यांच्या वरवंड येथील पार पडलेल्या सभेत नामदेव ताकवणे यांनी १ मे रोजी जाहीर केले होते की, भीमा पाटस कारखाना भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन येणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी. त्यानुसार १ मे रोजी नामदेव ताकवणे हे कारखान्यावर येऊन बसले मात्र कारखान्याचा कोणताही प्रतिनिधी किंवा अध्यक्ष कुल चर्चेसाठी आले नाहीत.
ताकवणे यांनी त्याच वेळी पुन्हा १५ मे रोजी येणार असून कारखान्याचे अध्यक्ष कुल यांनी मी केलेल्या आरोपाचे खंडन करावे असे आव्हान केले होते. त्यानुसार ताकवणे हे १५ मे रोजी भीमा पाटस कारखान्यावर आले कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय मधुकाका शितोळे यांना अभिवादन करून पुतळ्यासमोर एक तास बसले. याही वेळी कारखान्याचे अध्यक्ष व कारखान्याचा कोणताही अधिकारी, प्रतिनिधी या ठिकाणी फिरकला नाही.
यावेळी नामदेव ताकवणे म्हणाले की, ३० डिसेंबर २०२२ रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष कुल यांनी मी दीडशे कोटी आणले असून माझी मालमत्ता गहाण ठेवली आहे असे सांगितले होते. मात्र कुल यांना जिल्हा बँकेने एक रुपयाही भरला नसल्याने नोटीस बजावली आहे, कुल यांनी दीडशे कोटी आणलेले कुठे ठेवले हे जाहीर करावे, का दीडशे कोटी रुपयांचा ही अपहार केला ? असा सवाल उपस्थित केला.
भीमा साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला आहे त्याचे कागदपत्रे पुराव्यासहित आहेत. कारखान्याचे अध्यक्ष कुल हे चर्चेसाठी समोर आले नाहीत त्याचा अर्थ कारखान्यात भ्रष्टाचार झाला हे सिद्ध झाले आहे. कामगार आणि ऊस उत्पादक सभासदांच्या मालकीचा कारखाना वाचवण्यासाठी या घोटाळ्यांचा पर्दाफाश करणार आहे. असा इशारा ताकवणे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी सेवानिवृत्त कामगार व ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते.