किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह
शालेय दशेत मुलं किंवा मुली त्यांचे मित्र किंवा मैत्रिणी यांच्यामध्ये जास्त गुंतले जातात, जेवढे ते नातेवाईकांमध्ये गुंततात! अनेकदा मित्रच त्यांना वणव्यामध्ये गारव्यासारखा वाटतो..! भवानी नगरच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी हेच दाखवून दिले. सुखाच्या क्षणी अनेक जण येतील पण दुःखाच्या वेळी धावून येतो तो मित्रच!
भवानीनगरच्या सन १९९८ मध्ये दहावीपर्यंत शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅचने आपली मैत्री जपताना, आयुष्यभर पुरेल एवढी जपलीच आहे, पण अर्ध्यावर सोडून गेलेल्या, आयुष्यातून निघून गेलेल्या मित्राला देखील तेवढ्याच पद्धतीने जपण्याचं काम त्याच्या पाठीमागे त्याच्या कुटुंबाला पाठबळ देण्याचे काम देखील या मित्रांनी केले आहे.
सन 1998 मधील मार्च महिन्यापर्यंत जे विद्यार्थी दहावी मध्ये शिकत होते, असे विद्यार्थी त्यांचा एक ग्रुप चालवतात. सोशल मीडियावरील हा ग्रुप मित्रांच्या सुखदुःखाच्या वेळी एकमेकांच्या मदतीला धावून जातो. गेल्या तीन-चार घटनांमध्ये हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.
काही दिवसांपूर्वींचीच घटना! काटेवाडीतील मासाळवाडा भागात राहणाऱ्या रघुनाथ देवकाते या मित्राचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सर्व मित्रांना हा मोठा धक्का होता. रघुनाथच्या कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला.
या कुटुंबाने दुःखातून सावरणे तर महत्त्वाचे होतेच, पण त्याहीपेक्षा आपला मित्र ज्या अवस्थेत कुटुंबाला सोडून गेला आहे, त्याच्या पश्चात त्याची थोडी तरी जबाबदारी आपण घेतली पाहिजे अशी या सर्व मित्रांनी ठरवले आणि प्रत्येकाने आपापल्या परीने स्वयंस्फूर्तीने यात भाग घेतला.
काल रघुनाथ यांच्या मुलीच्या नावे या सर्व मुलांनी एक लाख रुपयाची अनामत रक्कम तिच्या भविष्यातील तरतुदीसाठी टपाल खात्यामध्ये जमा केली. दरम्यान आम्ही हे कोणतेही पुण्य काम किंवा मदतीचे काम केले नाही. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
फक्त आत्ताच नाही अशा अनेक घटना..
सन 1998 मधील शिकलेले हे विद्यार्थी केवळ देवकाते याच्या घटनेपुरतेच एकत्र आलेले नाहीत, तर ही आता जणू परंपराच बनली आहे. कारण यापूर्वी देखील अशा तीन-चार घटना घडलेल्या आहेत, ज्यामध्ये हे विद्यार्थी एकत्र आले आणि आपल्या मित्राच्या कुटुंबीयांना त्यांनी पाठबळ दिले. मानसिक व आर्थिक आधार दिला. त्यांना दुःखातून बाहेर येण्यासाठी सातत्याने मदत केली.
आता आम्हाला अशा काही दुःखद किंवा दुर्दैवी घटना घडल्या, तर वेगळे आवाहन करण्याची गरजच भासत नाही, स्वतःहून सारे विद्यार्थी पुढे येतात. आम्ही जवळपास दीडशे जण आहोत आणि प्रत्येक जण आपल्या परीने यामध्ये पुढाकार स्वयंस्फूर्तीने घेत असतो. हीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला एकमेकांचा प्रचंड आधार वाटतो आणि आम्हाला खात्री आहे की, आमच्या आयुष्यात आणि आयुष्यानंतरही ही आधाराची परंपरा कायम राहील असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.