दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मद्यपान करून वाहन चालवणे आता वाहन चालकांना महागात पडणार आहे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी मद्यपान करून गाडी चालवताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले असून महामार्गावर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चार मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर कासुर्डी टोलनाका येथे यवत पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी पथकाने वाहन चालकांची तपासणी केली असता, काही दुचाकी व चारचाकी वाहनचालक हे मद्यपान करून वाहन चालवत असताना आढळून आले.
जितु बाबुराव जाधव, लखन तपस्वीराम राठोड ( दोघे सध्या रा. कुरकुभ ता. दौड, जि.पुणे मुळ रा. तिमापुरी ता. जि. गुलबर्गा), मयुर अर्जुन परदेशी ( रा. बोरीपार्धी,ता. दौंड, जि.पुणे), बापु नाना थोरात ( रा. सहजपुर ,ता. दौंड, जि.पुणे ) अशी या गुन्हे दाखल करण्यात आलेल्या वाहन चालकांची नावे आहेत.
पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर कासुर्डी टोलनाका येथे नाकाबंदी करणाऱ्या पोलीस पथकाने दोन दुचाकी व एक चार चाकी वाहन चालकांवर ही कारवाई केली. हे वाहन चालक दारू पिऊन चुकीच्या पद्धतीने वाहन चालत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी वैद्यकीय आरोग्य तपासणी केली असता त्यांनी मद्यपान केले असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे मो.वा. का. क.१८५ कायद्याअंतर्गत यवत पोलीस ठाण्यात या सर्व जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्ग,राज्य मार्ग व जिल्हा मार्गावर सातत्याने होणाऱ्या जीवघेण्या अपघाताला आळा बसण्यासाठी वाहन चालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. दारू पिऊन व वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास संबंधित वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिले आहेत.