शिरूर : महान्यूज लाइव्ह
लागोपाठ दोन निवडणुकीत आमदार अशोक पवार यांच्या पॅनलचा पराभव झाला. जनतेने त्यांना नाकारले. आमदार पवारांना आत्मपरीक्षण करण्याची गरज असून पराभव का झाला? त्यांनी जाहीर करावे असा टीका जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल यांनी केली.
शिरूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, चालू वर्षी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे गाळप हे अतिशय कमी झाले.त्या उलट आमदार अशोक पवार यांचाच असलेल्या खासगी कारखान्याने गाळप क्षमतेपेक्षा जास्त गाळप केले आहे.
घोडगंगा साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट अद्याप दिले नाही. पुढील वर्षी कारखाना सुरू होईल अशी परिस्थिती सध्या नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी खंबीरपणे मी लढ्यात उतरत असून कारखाना वाचविण्यासाठी पुढाकार घेत आहे. दहशत, दादागिरी एकाधिकारशाही या जोरावर त्यांनी निवडणुका लढवल्या.
नुकत्याच झालेल्या जिजामाता महिला सहकारी बँकेत निवडणुकीत माझ्या विरोधात अपप्रचार केला. बदनामी केली, मात्र ही निवडणूक जनतेने हाती घेतली होती. जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. त्या उलट आमदार पवार यांनी नेवृत्त्वात लढवलेल्या हवेली बाजार समिती निवडणुकीत त्यांच्या पॅनल ला मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. लागोपाठ झालेल्या दोन निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव याचे अशोक पवार यांनी आत्मपरीक्षण करावे असा टोला या वेळी त्यांनी लगावला.
माझ्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. आम्ही पण असे करू शकतो पण तसे करणार नाही. कारखान्याची हडपलेली पाच एकर जमीन पुन्हा कारखान्यास परत करा, नैतिकता असेल तर राजीनामा द्या. लोकसभेची निवडणूक लढवण्यास मी इच्छुक असून जे मदत करतील, त्यांची उतराई केल्याशिवाय राहणार नाही असे मंगलदास बांदल यावेळी म्हणाले.