शिरूर : महान्यूज लाईव्ह
पोलीस म्हटलं की कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम.. पोलीस म्हटलं की भांडण मिटवण्याचं काम.. पोलीस म्हटलं की गुन्हा दाखल करण्याचं काम.. पोलीस म्हटलं की रस्त्यावरची गर्दी आवरण्याचे काम.. पोलीस म्हटलं की शाळेच्या आवारातल्या सडफटांग पोरांना सरळ करणारं काम.. पोलीस म्हटलं की दरारा, रुबाब, आदब.. हो..हो.. पण पोलिसिंग एवढेच असतं का?
जर पोलिसाची इच्छाशक्ती असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा राखून आखून दिलेलं काम सर्वतोपरी ताकदीने पार पाडून त्याही पलीकडे जाऊन माणूस म्हणून काम करण्याची त्याची तत्परता पाहिली की त्याला खरोखर सलाम ठोकावासा वाटतो. सध्या राज्यातील काही पोलीस अधिकारी अशा ठिकाणी काम करताना दिसले की, लोकांमध्ये देखील त्यांच्याविषयीचा आदर आणि आदर कैकपटीने वाढलेला दिसतो. जुन्नर तालुक्यातही असंच उदाहरण पाहायला मिळालं.
जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस पाण्याची टंचाई भीषण परिस्थिती निर्माण होत असून अनेक भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कोपरे, मांडवे, मुथाळणे या आदिवासी दुर्गम भागातील लोकांना दूरवर पायपीट करून पाणी डोक्यावर वाहून आणावे लागते.
नागरिकांची हीच गरज ओळखून ओतूर चे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी पुढाकार घेतला. नागरिकांना स्वतः टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले. पाण्याची गरज उन्हाळ्यात दिसते. पाण्याची ताकद उन्हाळ्यात दिसते. त्यामुळेच कांडगे यांनी दाखवलेल्या माणुसकीच्या संवेदनशीलतेने नागरिक भारावले असून कौतुक केले जात आहे.