दौलतराव पिसाळ: महान्यूज लाईव्ह
वाई : वाई बसस्थानक परिसरात प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने वाईच्या एसटी स्टँडवर ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याची टाकी जणू शोभिवंत वस्तू असल्यासारखेच येथे उभी आहे.
उन्हाचा पारा वाढलेला असतानाच पाणीटंचाई असल्याने व पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाणी सोडले जात नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. वाई परिसरामध्ये जवळपास 117 आजूबाजूच्या दुर्गम गावातून प्रवासी येतात आणि जातात. त्याचबरोबर महाबळेश्वर, पाचगणी इथूनही प्रवासी ये-जा करत असतात, मात्र येथील बसस्थानक परिसरात पाण्याची टंचाई असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
वाईच्या बसस्थानक परिसरात येणारी प्रवासी हे अल्प उत्पन्न गटातील बहुतांश असल्याने प्रत्येक वेळी 20 रुपयाची पाण्याची बाटली विकत घेण्याची त्यांची ऐपत नसते, अर्थात त्यांनी ती का विकत घ्यावी? असा देखील प्रश्न असून, कदाचित परिसरातील पाण्याच्या बाटल्या खपाव्यात म्हणून बसस्थानक प्रशासनाने जाणीवपूर्वक येथील पाण्याच्या टाकीत पाणी सोडले नाही का? असा सवाल देखील प्रवासी विचारत आहेत.
सन 1996 मध्ये तत्कालीन बस स्थानकाच्या चालक दीपक व प्रदीप गुप्ता आणि वाई तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व असलेले कै.पोपटलाल ओसवाल व त्यांच्या भावंडांनी प्रवाशांना वाईच्या एसटी स्टँडवर पिण्याचे पाणी मिळावे यासाठी स्वखर्चाने एक हजार लिटर पाणी साठवण क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधली व आगाराच्या स्वाधीन केली होती.