दौलतराव पिसाळ
वाई : महान्यूज लाईव्ह
पुणे सातारा हायवेवर सतत अपघात होत आहेत. ९ मे रोजीही या रस्त्यावरील वाई तालुक्यातील वेळे गावातील एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. या अपघातांना या रस्त्याचे काम पाहणारी नॅशनल हायवे अॅथॉरिटीची कारण असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे या तरुणाच्या अपघातानंतर आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दत्तात्रय मानसिंग पवार हे मृत युवकाचे नाव असून तो वेळे गावात रहात होता. त्याच्या दुचाकीला सातारा बाजुकडे भरधाव वेगाने जात असलेल्या एका काळ्या रंगाच्या कारने जोरदार धडक दिली आणि या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातानंतर वेळे येथील हॉटेल व्यावसायिक तरुण आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या तरुणाचे अपघाती निधन झाल्याने वेळे गावावर शोककळा पसरली आहे .
वेळे येथील माजी सरपंच दशरथ पवार आणी तरुणांच्या टिमने बुधवार दि.१० रोजी मयत दत्तात्रय पवार यांच्या मृतदेहाला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अग्नी दिला. पळून गेलेल्या कारचा शोध महामार्गावरील सीसीटिव्ही कॅमेरे तपासुन पाहत असताना ही कार वाई येथील सायली हॉटेलच्या पुढच्या बाजुला असणाऱ्या गांधी पेट्रोल पंपावर पार्किंग केलेली आढळून आली .
भुईंज पोलीस याबाबत पुढील तपास करीत आहेत.