दौंड – महान्यूज लाईव्ह
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यवत परिसरातील मानकोबावाडी येथील आठ सराईत गुन्हेगारांना पुणे ग्रामीण पोलिसांनी सहा महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ही माहिती यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
दौंड शहरातील खाटीक गल्ली येथील सात जणांना गुन्हेगारी टोळीला तडीपार केल्याची घटना ताजी असताना आता तालुक्यातील आणखी आठ सराईत गुन्हेगारांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तडीपार केल्याने दौंड शहरासह तालुक्यातील गुन्हेगारी टोळीने धसका घेतला आहे.
अक्षय लालू लकडे, शुभम बाळू लकडे, शुभम उर्फ भाऊ आबा लकडे, विशाल नंदू खताळ, सागर ठकू खताळ, खंडू धनाजी ठोकळे, रोहित गोपीनाथ गवळी (सर्व रा. यवत, मानकोबावाडी) तसेच गौरव नामदेव अवचर (रा. उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे) अशी तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
या आठ जणांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून टोळी करून दहशत निर्माण करण्याचेही गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांनी टोळी निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. त्याला आळा घालण्यासाठी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे सदर गुन्हेगारांना तडीपार करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता.
हा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोल यांनी मंजूर केला असून या आठ गुन्हेगारांना ६ मे २०२३ पासून पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.