सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर
इंदापूर शहरातील ज्येष्ठ मार्गदर्शिका, शारीरिक व्याधी असताना कर्तृत्वाच्या जोरावर हिमतीने आदर्श प्रपंच उभा करत समाजासमोर आदर्श निर्माण करणा-या उषा भानुदास शिताप (वय ६५) यांचे काल रविवारी (दि.७) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ते, युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक तसेच माजी नगरसेवक प्रशांत शिताप, पैलवान विजय शिताप व सरकारी कर्मचारी विकास शिताप हे त्यांचे पुत्र होत.
काल सायंकाळी सात वाजता इंदापुरातील हिंदू स्मशानभूमीमध्ये उषा शिताप यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंचवीस वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यावर कुटुंबाची जबाबदारी स्वतःवर पडल्यावर उषा शिताफ यांनी आपल्या तीनही मुलांना आदर्श व्यक्तिमत्व म्हणून घडवण्याची यशस्वी जबाबदारी पार पडली.
तीनही मुलांना समाजामध्ये खूप मोठे स्थान निर्माण करून दिले. जीवनाशी संघर्ष करत आपल्या मुलांना व समाजातील युवा पिढीला चांगल्या संस्काराचे मार्गदर्शन करत असताना त्यांनी सामाजात आदर्श निर्माण केला.
काल शहरातील विविध मान्यवरांनी उषा शिताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.