बारामती : महान्यूज लाईव्ह
बापलेकांनो.. ज्यांच्या घरी बुलेट आहे किंवा ज्या घरातला दिवटा अत्यंत हट्ट करून बापाकडून बुलेट घेतोय; त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची!! केवळ बुलेटच नाही, तर गाडीच्या सायलेन्सर च्या पुंगळ्या काढून गावभर होऊन जाणाऱ्या अथवा शायनिंग मारणाऱ्या प्रत्येक सडकसख्याहारींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.
बारामती अप्पर पोलीस अधीक्षकांच्या विभागात गेल्या तीन दिवसात तब्बल 86 बुलेट मोटरसायकलवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून मोठ्या आवाजाच्या पुंगळ्या काढून घेऊन तब्बल 86 हजार रुपयांचा दंडदेखील पोलिसांनी ठोठावला आहे. बारामती, वालचंदनगर, यवत, इंदापूर, राजगड, माळेगाव, जेजुरी, वडगाव निंबाळकर, भिगवण, सासवड, दौंड आणि भोर अशा पोलीस ठाण्यांमधील ही कारवाई असून यामध्ये सर्वाधिक दंड बारामती शहरात व बारामती तालुक्यात आकारण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल व बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही कारवाई करण्यात आली यामध्ये भोर, वे पुरंदर बारामती दौंड इंदापूर या तालुक्यांमध्ये ही कारवाई कठोरपणे राबवण्यात आली.
बुलेट सह अधिक सीसीच्या क्षमतेच्या गाड्या घेऊन जयंती, उत्सव किंवा गावच्या निवडणुका अथवा इतर वेळीदेखील महाविद्यालयीन आवाराचा परिसर असेल, या ठिकाणी ही मुले मोठा आवाज करत फिरत असतात. गेल्या काही दिवसापासून पोलीस अशा वृत्तीवर लक्ष ठेवून होते. पोलीस अधीक्षक व अपराधीक्षकाने सूचना देताच दोन दिवस पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बॅरिकेट्स लावून पोलिसांनी अशी मुले शोधली आणि त्यांच्यावर कारवाई केली.
प्रत्येकी एक हजार रुपये दंड आणि त्याच मुलांच्या हातात सायलेन्सर काढून देत पोलिसांनी त्यांची लायकी दाखवली. राज्य परिवहन विभागाने घालून दिलेल्या नियमांचा अभंग केल्यास त्याचा देखील अतिरिक्त गुन्हा दाखल करण्याची सूचना पोलीस अधिकारी यांनी केली असून मूळ गाडीमध्ये कोणताही बदल केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.
आनंद भोईटे, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती : बुलेट गाड्या फिरवताना त्यामध्ये कोणताही बदल करू नका. असा बेकायदा बदल केलेल्या बुलेटचालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढेही ती कारवाई सुरू राहील. उलट आता केलेला दंड आणि सायलेन्सर काढून घेण्याची करण्यात आलेली कारवाई या पुढील काळात आणखी कठोर केली जाईल. पालकांनी देखील आपली मुले नेमकी कशाप्रकारे गाडी चालवतात याकडे लक्ष द्यावे. अन्यथा या पुढील काळात पालकांनाही अशा कारवाईला सामोरे जावे लागेल. वाहनांमध्ये कोणताही बदल करणे दंडनीय अपराध असून बुलेट मधील सायलेन्सर बदलल्यास यापुढे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या आहेत.