दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
मुलगी झाली म्हणून सासरची मंडळी सातत्याने आपल्याला अपशकुनी म्हणतात. लग्नात टीव्ही, फ्रिज दिला नाही म्हणून सतत मानसिक शारीरिक छळ करतात या कारणावरून मांढरदेव (तालुका वाई) येथील माहेरवाशीणीने वाईची पोलीस ठाण्याची पायरी चढली आणि सासरच्या मंडळींविरोधात मानसिक व शारीरिक छळाचा गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मांढरदेव (ता .वाई) येथील गौरी (वय २७ वर्ष) हिचा सन२०१६ मध्ये सुरज शरद बोभाटे (राहणार ४५३ चिपळूण बाग मंगळवार पेठ सातारा) याच्याबरोबर विवाह झाला. लग्नात वडिलांनी मानपान व संसारोपयोगी साहित्य दिले. लग्नानंतर एक महिना सासरचे सर्व लोक प्रामाणिक वागले.
त्यानंतर नणंदेचे सतत माहेरी येणे जाणे होत असल्याने तिच्या सांगण्यावरुन सासू लक्ष्मी शरद बोभाटे व पती सुरज बोभाटे यांनी संगनमत करुन लग्नात हुंडा दिला नाही, आमचा मानपान केला नाही, फ्रिज, टिव्ही दिला नाही असे आरोप करुन माहेरहून पैसे घेऊन ये असा दम देऊन घरातून हाकलून दिले.
पुन्हा सासरी घेऊन गेल्यावर गर्भवती असताना आम्हाला मुलगा हवा आहे असे म्हणत सासरच्या सर्वांनीच गर्भलिंग तपासणीचा आग्रह धरला पण त्यास विरोध केल्याने गौरी हिस पुन्हा माहेरी हाकलून दिले. तिला मुलगी झाली त्याचा राग मनात धरून उठता बसता तू अपशकुनी आहेस असे सतत टोमणे मारु लागले. त्या रागाच्या भरात तिला पुन्हा २९ एप्रिल २०२३ रोजी मांढरदेव येथे माहेरी आणून सोडले.
या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर गौरी सुरज बोभाटे हिने सासु नणंद व पती विरोधात वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.