राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील मयुरेश्वर अभयारण्यात मागील काही दिवसांपासून कारखान्यातील दूषित पाणी टँकरने आणून ठिकाणी टाकले जात आहे. या दूषित पाण्यामुळे वन्यजीव प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वन विभागाने संबंधित टँकर चालक मालक यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे.
दौंड तालुक्यातील कुसेगाव, पडवी, देऊळगावगाडा आदी परिसर हा मयुरेश्वर अभयारण्याने व्यापला आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा परिसर पावसाळ्यात एक पर्यटन स्थळ म्हणून याकडे पाहिले जात आहे. ह्या आभारण्यात वन्यप्रेमी व पक्षांची संख्या मोठी आहे. मात्र सध्या मागील काही दिवसांपासून परिसरातील कारखान्याचे दूषित सांडपाणी कुसेगाव परिसरातील अभयारण्यात आणून टाकले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
टँकरद्वारे हे दूषित पाणी वनविभागाच्या हद्दीत व वनविभागाच्या हद्दीबाहेर आणून टाकले जात आहे. हे दूषित पाणी पावसाळ्यात वाहून वनविभागातील छोटे-मोठे तलाव यामध्ये जाऊन पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. तसेच हे दूषित पाणी या अभयारण्यातील वन्य प्राणी व पक्षी पिल्यास त्यांच्या जीवितेला व आरोग्याला मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे दूषित सांडपाणी या ठिकाणी सोडल्याने वन्यप्राणी व पक्षांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले आहे.
हा अतिशय गंभीर प्रकार आहे. या अभयारण्यातील वन्यप्राणी यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या संबंधित टँकरचालक व मालकांवर वनविभागाने कठोर पावले उचलून गुन्हे दाखल करत कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी परिसरातील वन्यप्रेमींकडून होत आहे