राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरून शेतकऱ्यांची पाळीव जनावरे खरेदी विक्री करण्यासाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून दौंड तालुक्यातील काही स्वयंघोषित गोरक्षक पोलीस कारवाई करण्याची धमकी देत आर्थिक पिळवणूक करीत आहेत. यवत व दौंड पोलिसांनी अशा स्वयंघोषित गोरक्षण कार्यकर्त्यांना शोधून कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे.
दौंड तालुक्यातील यवत व दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे सोलापूर महामार्ग व पाटस – दौंड अष्टविनायक मार्गावरून दौंड तालुक्यातील काही शेतकरी आपले पाळीव जनावरे श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी, बारामती व तालुक्यातील जनावरांच्या बाजारात खरेदी विक्रीसाठी ने- आण करीत असतात.
मात्र सध्या या महामार्गावर तालुक्यातील वरवंड, चौफुला, केडगाव रावणगाव या भागातील स्वयंघोषित गोरक्षण कार्यकर्त्यांनी ही वाहने अडवत धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे गोरक्षणासंदर्भात कायदेशीर व चांगले काम करणाऱ्या गोरक्षण कार्यकर्त्यांना देखील अशा बोगस गोरक्षण कार्यकर्त्यांमुळे बदनामी सहन करावी लागते.
महामार्गावर पाळीव जनावरांच्या वाहनांवर पाळत ठेवायची आणि ही वाहने गर्दी नसलेल्या ठिकाणी अडवून वाहन चालकाला व शेतकऱ्यांना कत्तलखान्यासाठी चालवली आहेत, तुमच्यावर पोलीस कारवाई करतो अशी धमकी देत भिती निर्माण केली जाते. त्यानंतर आर्थिक तडजोडीचाही प्रयत्न केला जातो. जर आर्थिक तडजोड झाली नाही, तर ही वाहने पोलीस चौकीत नेऊन पोलिसांना गुन्हे दाखल करून कारवाई करायची मागणी केली जाते.
एवढेच नाही तर समोरची व्यक्ती घाबरली तर पाळीव जनावरे ताब्यात घ्यायची, एखाद्या लांबच्या गोशाळेत घेऊन जायचे आणि कमिशनद्वारे ही जनावरे त्यांच्या ताब्यात द्यायची. हा नवा व्यवसाय स्वयंघोषित गोरक्षक कार्यकर्त्यांनी शोधला आहे. याच पाळीव जनावरांची पुढे काही दिवसांनी खरेदी-विक्री करून मोठी आर्थिक उलाढाल केली जात असावी असा शेतकऱ्यांना संशय आहे.
एकंदरीत शेतकऱ्यांनी आपली पाळीव जनावरे खरेदीविक्रीसाठी वाहतूक करावी का नाही ? असा प्रश्न या स्वयंघोषित गोरक्षक कार्यकर्त्यांच्या दहशतीमुळे निर्माण झाला आहे. यवत व दौंड पोलिसांनी अशा स्वयंघोषित गोरक्षकांवर कारवाई करावी. मात्र जर खरंच जनावरे कत्तलखान्यासाठी नेली जात असतील, तर पोलिसांनीच अशा वाहनांवर ही कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही शेतकरी करीत आहेत.