शरद पवारांचा एक फोन आणि मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका. पालकांनी गोविंद बागेत घेतली शरद पवारांची भेट
विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
बारामती : शरद पवार हे राज्याच्या केंद्रस्थानी असलेले नेते आहेत हे त्यांनी २ मे ते ५ मे या तीन दिवसांमध्ये पुन्हा एकदा राज्याला आणि देशाला दाखवून दिले आहे.अशात फक्त एक फोन फिरवून शरद पवारांनी धुमसणाऱ्या मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या मुलांची सुटका केली.
सांगलीतल्या जत तालुक्यातले काही विद्यार्थी हे मणिपूरमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत.मात्र मणिपूर हिंसाचार होत आहे. या धुमसणाऱ्या मणिपूरमध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी अडकले.जत तालुक्यातल्या आवंडी गावाचे रहिवासी संभाजी कोडग यांचा मुलगा मयूरने आपल्या वडिलांना फोन केला. मणिपूरची परिस्थिती सांगितली आणि चारही बाजूंना गोळीबार होतोय, कदाचित हा माझा शेवटचा फोन असेल असेही सांगितले. मुलाने असा फोन केलेला ऐकून वडिलांच्या काळजाचे पाणी झाले.
त्यानंतर संभाजी कोडग यांनी बारामती तालुक्यांतील शेतकरी प्रल्हाद वरे यांना फोन केला. मणिपूरच्या दंगलीत महाराष्ट्रातली १० मुले हॉस्टेलवर अडकल्याचे सांगितले आणि त्यांना काहीही करून वाचविण्याची विनंती केली. त्यानंतर ५ मे रोजी आपण शरद पवारांना भेटू असे वरे यांनी संभाजी कोडग यांना सांगितले. पण मणिपूरची परिस्थिती चिघळत होती. त्यामुळे संभाजी कोडग यांनी शरद पवारांना एवढा निरोप द्या,अशी विनंती केली. त्यानंतर प्रल्हाद वरे यांनी शरद पवारांचे खासगी सचिव सतीश राऊत यांचा संपर्क क्रमांक दिला. संभाजी कोडक यांनी सतीश राऊत यांना सर्व परिस्थिती सांगितली.
सतीश राऊत यांनी ही सगळी परिस्थिती ऐकली आणि शरद पवार यांना तातडीने हा निरोप दिला.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शरद पवार यांनी तातडीने मणिपूरच्या राज्यपालांना फोन केला. ज्यानंतर, महाराष्ट्रातल्या १० मुलांसह दुसऱ्या राज्यातील दोन मुलांना सुरक्षित ठिकाणी न्या अशी विनंती केली. यानंतर रात्री १२च्या सुमारास संभाजी कोडग यांचा मुलगा मयूरला मणिपूर लष्कराच्या चीफ कमांडरचा फोन आला आणि आम्ही तुम्हाला सुरक्षित स्थळी नेत आहोत असे त्याला सांगितले. या १२ विद्यार्थ्यांना रात्रीच सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे.
यावेळी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातून आयआयटीचं शिक्षण घेण्यासाठी मणिपूरमध्ये गेलेले काही विद्यार्थी अडकले आहेत. त्यांच्या पालकांनी आज माझी भेट घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना आणण्याबाबत मी चर्चा करतोय, मात्र संपर्क झालेला नाही. आता मी फोनद्वारे संपर्क साधणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
त्यानंतर आज पालकांनी गोविंद बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी तातडीने सूत्रं हलवून आपल्या मुलांचा जीव वाचवला याबद्दल या मुलांच्या पालकांनी शरद पवारांचे आभार मानले आहेत.