रविंद्र काळे, उद्योजक बारामती.
(मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेरील उठलेलं वादळ त्यांनीच शांत केलं.. पण विश्रांती? छे.. झंझावात कसा राहीला, हे काळे यांनी केलेल्या पोस्टवरून साभार.. )
वाटलं.. २ मे, २०२३ रोजी उठलेलं वादळ काल सायंकाळी शांत झालं ! तसंही सध्याच्या काळात वातावरणात बदल ( Climate Change ) ही नेहमीची प्रक्रिया झाली आहे ! राजकारणात देखील तेच घडतंय! त्या चार दिवसाच्या उठलेल्या वादळाने बारामती तर हेलावून गेली होती.
साहेबांवर आणि एकूणच पवार कुटूंबियांवर प्रेम करणारे आम्ही बारामतीकर तर पुरते हवालदिल झालो होतो. पण एकदाचं ग्रहण सुटलं आणि साहेब नावाच्या वादळाचा झंझावात सुरू झाला.
आज (म्हणजे काल) दुपारी गाड्यांचा गर्दीचा झंझावात अगदी वादळासारखा घोंगावत गोविंदबागेकडे येत असल्याचे समजले आणि मी, नाना देवकाते (जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते), योगेश जगताप असे साहेबांच्या काही निवडक चाहत्यांसह प्रवेशद्वारासमोर स्वागतासाठी सज्ज राहिलो.
घोषणांच्या हलकल्लोळात साहेबांचे आम्ही स्वागत केले. मग वाटले! आता तीन दिवसाच्या भाऊगर्दीमुळे साहेब आता विश्रांती घेतील. पण विश्रांती घेईल, ते वादळ कसलं? साहेब आम्हाला म्हणाले, चला, फलटणजवळ एक डाळिंबाची बाग पाहायला जाऊ!
आम्हाला तर गगन ठेंगणे! साहेबांच्या सानिध्यात अर्धा दिवस जाणार यापेक्षा अप्रूप काय असावं? त्यात कृषी विकास प्रतिष्ठानच्या निलेश नलावडे सरांनी आणखी एका भेटीची भर घातली. साहेबांना सायन्स पार्कमधील लहान मुलांच्या कार्यशाळेला भेट द्यावी ही विनंती केली, ती साहेबांनी अगदी लगेचच मान्य केली.
जेवण झालं तसे साहेब बाहेर आले. मी आणि योगेश जगताप साहेबांसोबत गाडीत बसलो. सायन्स पार्कमध्ये पोचल्यावर मुलांशी हितगुज करताना साहेबांनी मला आवर्जून शेजारी बसवले. अर्ध्या तासाने पुन्हा गोविंदबागेत गेलो. तिथे प्रसारमाध्यमांशी चर्चा आणि आमच्याशी गप्पा झाल्या .
झालं.. साडेतीनच्या सुमारास गाडया फलटणच्या दिशेने निघाल्या! यावेळी नाना देवकाते गाडीत सामील झाले. ४० मिनिटात फलटण पार करून वाठार निंबाळकर गावाच्या शिवारात एका विस्तिर्ण बागेतील गाडीवाटेने मोजक्या गाड्यांचा ताफा आत घुसला.
दुतर्फा टुमदार झाडांना लगडलेली डाळींबाची लाल- भगवी फळे आमचे स्वागत करीत होती. साहेबांनी बागेत उतरून डाळींब बागेच्या व्यवस्थेची पाहणी केली. उत्पादन , विक्री , निर्यातीबाबत चौकशी केली. तेल्या रोगापासून बागेचे संरक्षण कसे करतात याची बारकावे विचारत माहिती घेतली.
चंद्रकांत अहिरेकर या उमद्या तरूण शेतकऱ्याचे कौतुक केले. त्याच्या कुटूंबियांशी संवाद साधला. आदरातिथ्य स्विकारले . निरोप घेताना अहिरेकरांनी इराण – अफगणिस्तान देशांतील डाळींब बागेची माहिती घेण्यासाठी सरकारतर्फे पाठवता येईल का? याची माहिती घेत असल्याचे सांगितले.
साहेबांनी निरोप घेतला आणि आम्ही पुन्हा बारामतीकडे निघालों.
अर्ध्या पाऊण तासात आमची सुट्टी होईल असे वाटले. पण साहेबांनी संपूर्ण बारामती शहरात फेरफटका मारला. अजित दादांच्या प्रयत्नाने उभे राहिलेले मेडिकल कॅालेज , विद्या प्रतिष्ठान मधील नव्याने आकारास येत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचे पायाभरणी काम आम्हाला दाखवले. पुन्हा गोविंदबाग गाठली.
पुन्हा गप्पा रंगल्या, भेटीगाठी झाल्या. अखेर संध्याकाळी आठच्या सुमारास गोविंदबागेतून आम्ही निरोप घेतला. साहेबांचा कधीही न मावळणारा उत्साह बघून आमच्या अंगात नवी उर्जा निर्माण झाली. आमची पॉझिटिव्ह उर्जा कमी झाली की, ती चार्जिंग करायला मार्गदर्शनासाठी तसेही साहेब हवेच असतात. अन ते बारामतीला आले की त्यांच्या दर्शनाने सकारात्मकता येते !
आज तर अर्धा दिवस त्यांच्या सहवासात गेला ! खूप धन्यता वाटली. साहेब असेच भेटत राहोत ! शरद पवार साहेब नावाचा उर्जास्त्रोत अक्षय राहावा हेच मागणे! बारामतीकर असल्याचा सार्थ अभिमान वाटतो तो साहेबांमुळे आणि पवार कुटुंबियांशी जुळून आलेल्या स्नेहभावामुळे!