सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – इंदापूर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नागरीकांवर सतत च्या होणा-या हल्ल्याने जखमींची संख्या वाढली आहे. तर डुकरांच्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले आहे. सार्वजनिक रस्त्यावरून जाणारे नागरिक भयभीत झाले आहेत. इंदापूरच्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून इंदापूर नगरपालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांचा व डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांची आहे.
दरम्यान नगरपालिकेने तात्काळ कारवाई न केल्यास अनोख्या स्टाईलने आंदोलन करावे लागेल असा गर्भित इशारा समता सैनिक दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोक पोळ यांनी दिला आहे. शहरातील मोकाट भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान मुलांना भितीच्या छायेखाली रस्त्यावरुन जावे लागत आहे.
वास्तविक पाहता कर वसुलीसाठी शहरवासीयांना सळो की पळो करून सोडणा-या नगरपालिकेने अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे. शहरातील नगरपालिका परिसर,चाळीस फुटी रोड, कोर्ट ते शहा सांस्कृतिक भवन, व्यंकटेश नगर चा रस्ता आदी भागातून रस्त्यावरुन जाणा-या नागरिकांवर कुत्र्यांनी अनेक वेळा हल्ले केल्याने नागरिकच सुरक्षित नाहीत.
नगरपालिका कुत्र्यांचा आणि डुकरांचा बंदोबस्त करत नसेल व नागरिकांना त्रास देण्याची भूमिका असेल तर नगरपालिकेचे अधिकारी काय कामाचे ? असा सवाल जनतेतून उमटू लागला आहे. पुढील महिन्यात शाळा, महाविद्यालय सुरू होणार आहेत. अशावेळी पहाटे शालेय विद्यार्थ्यांना शाळेसाठी, क्लाससाठी नगरपालिकेजवळून तसेच 40 फुटी रोडने मराठी शाळेच्या पाठीमागील जावे लागत असते. मात्र विद्यार्थ्यी, पालक व नगरपालिकेला अनेक वेळा सांगूनही कसलीच गांभिर्य दिसून आले नाही. त्यामुळे नागरिक नाराज आहेत.
शहरातील कोर्टापासून शहा कार्यालयापर्यंत तसेच अकलूज नाक्यावर जाणा-या रोडवर कुत्र्यांचा रात्रीच्या वेळी उपद्रव दिसून येतो. सावतामाळीनगर येथील सावतामाळी मंदिराच्या जवळच रस्त्यावरून पाळीव काळ्या कुत्र्याने त्याच्या मालकासमोरच अनेक नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी त्या कुत्र्याबरोबर कुत्र्याचे मालकही असतात, मात्र त्यांनी हल्ला करताना कधीही रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
उलट त्यांना कुत्रे दुसऱ्याच्या अंगावर जात असल्याने त्यांना आनंद मिळत असावा. ही घटना जबाबदार नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिली आहे. तेथील जबाबदार नागरिकांना ही गोष्ट निदर्शनास आणूनही देण्यात आली आहे. असे घडत असल्यास अशा कुत्र्यांचाही बंदोबस्त करावा व नागरिकांना याबाबत स्पष्ट ताकीद दिली जावी.शहरात अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शालेय सुट्टीच्या दिवसामुळे रात्रीच्या वेळी पाहुण्यांना नातेवाईकांकडे जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते.
सामाजिक कार्यकर्ते व समता सैनिक दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोक पोळ यांनी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी शहरात किमान दररोज २ ते ३ नागरीक हे कुत्र्याच्या चाव्याचे शिकार होत असल्याचे सांगितले. अनेक रुग्ण कुत्रे चावल्याने उपचार घेण्यासाठी येत असतात, एखाद्या दिवशी तर सात ते आठ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचेही दिसून आल्याचे संबंधितांनी सांगितले.
त्यामुळे या गोष्टीकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. गणेशनगर भाग, नगरपालिका परिसर, पंधारनाला, कसबा डुकरांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील मोकाट, भटकी कुत्री, डुकरे व अन्य स्वरुपाच्या मोकाट भटक्या जनावरांच्या पर्यायी व्यवस्थेसाठी नगरपरिषद दरवर्षी वार्षिक टेंडरच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करते, मात्र या मोकाट जनावरांचा प्रश्न आजही कायमच आहे.
अशोक पोळ म्हणाले की ,नगरपरीषदेने इंदापूरकरांच्या जीवाशी खेळू नये. शहरातील भटक्या व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, नगरपालिका प्रशासनाने त्यांची तातडीने पर्यायी व्यवस्था करावी. अन्यथा समता सैनिक दल या सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.