फलटण : महान्यूज लाईव्ह
चार दिवस संपूर्ण देशाचे राजकारण ज्यांच्याभोवती केंद्रीत झाले होते, ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईतील राजकारणाच्या आखाड्यातून पुण्यात व थेट तेथून बारामतीत पोचले. गोविंदबागेत पत्रकारांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी कृषी विज्ञान केंद्रात विज्ञान पार्कला भेट दिली. येथे चिमुकल्या मुलांना 1966 च्या दुष्काळाची माहिती दिली आणि विज्ञानाची सफर करणाऱ्या मुलांना आधुनिक काळाचा मंत्र देखील दिला.

तेथून त्यांनी विश्रांती न घेता थेट फलटण गाठले. रविवारी ते सोलापूरला भेट देणार आहेत, मात्र फलटणच्या भेटीत त्यांनी वाठार निंबाळकर ला भेट दिली आणि या ठिकाणी त्यांनी डाळिंब बागेची पाहणी केली. यानंतर तेथील शेतकऱ्यांची देखील त्यांनी चर्चा केली.
फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर गावचे चंद्रकांत रामचंद्र अहिरेकर यांच्या २० एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या डाळींब बागेला त्यांनी भेट दिली. श्री अहिरेकर त्यांच्या शेतामध्ये भगवा जातीच्या डाळिंबाचे एकरी १० टन इतके दर्जेदार प्रतीचे उत्पादन घेतात. तसेच सुमारे ८० टक्के माल हा आखाती देशात आणि युरोपात निर्यात करतात अशी माहिती मिळाल्यानंतर पवार यांनी त्यांचे कौतुक केले व या डाळिंब बागेची पाहणी करत त्यांनी संपूर्ण माहिती घेतली.
अहिरेकर यांच्या विषयी लिहिताना पवार यांनी नमूद केले आहे की, डाळिंबाची बाग अतिशय स्वच्छ ठेवली असून फळांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी झाडांवर आच्छादनाचा वापर केला आहे. अहिरेकर कुटुंब घेत असलेल्या कष्टाबद्दल त्यांचे मनापासून कौतुक!
एकूणच ज्या ज्या वेळी राजकीय संकट येते, त्यावेळी पवार हे थेट जनमानसात मिसळतात. सन 2019 चा काळ आठवला की त्याची प्रचिती येते. शरद पवार यांनी त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातून आपला दौरा सुरू केला होता. आज राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा नवी दिशा देण्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्याची निवड केली होती.