बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राजीनामा व पदाच्या निवृत्तीचा मागे घेण्याच्या निर्णयानंतर आज पहिल्यांदाच बारामतीत आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी अजित पवार यांच्या संदर्भातील प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार यांनी या सर्वांचा एका शब्दात निकाल लावला.
पवार म्हणाले, अजित पवार हे प्रामाणिकपणे त्यांचे काम करत आहेत. काही लोकांना फक्त काम करण्यात इंटरेस्ट असतो, तर काही लोकांना वृत्तपत्रात बातमी छापून आणण्याकडे त्यांचा कल असतो. अजित पवार हे मीडिया फ्रेंडली नाहीत हे बऱ्याचशा पत्रकारांना माहित आहे.
त्यांचा स्वभाव लक्षात घेता ते कामाला प्राधान्य देतात. ते प्रामाणिकपणे काम करत आहेत. दुसरी गोष्ट राजकारणामध्ये अथवा इतर कोठेही आपण एकमेकांना भेटतो. हे भेटणे म्हणजे त्याची राजकीय चर्चा होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट समजा, मला पत्रकारांनी काय प्रश्न विचारले किंवा मला पत्रकार भेटले, तर मी त्यांच्याशी बोलतो तसेच ते बोलले तर त्याचा गैर अर्थ काढला जातो.
माझी विनंती आहे, अजित पवार यांच्या संदर्भात कोणतीही चुकीची वृत्त पसरवू नका. ते त्यांचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांच्या कामाचा वेग राखण्यात आणि त्यांना कामे करण्यात जास्त रस असतो. अजित पवार यांना वृत्तपत्रात काय छापून येते, याची काही चिंता नसते. त्यांना त्यांच्या भागातील, राज्यातील विकासकामाची चिंता अधिक असते. त्यामुळे त्यांच्या कामापेक्षा त्यांच्याविषयी गैरसमजच अधिक पसरवले जातात.
काही लोक वेगवेळा प्रचार करतात, काही लोकांच्या कामाच्या पद्धती वेगळे असतात मी कुठेही गेलो पत्रकार भेटले किंवा कोणी भेटले तर मी त्यांच्याबरोबर बोलतो अजित दादा त्यांच्या फिल्ड वरील कामासाठी प्रसिद्ध आहेत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेशी ते संबंधित असतात ते फारसे कोणाशी बोलत नाहीत ते मीडिया फ्रेंडली नाही ते सर्वांनाच माहिती आहे.
राजीनामा व निवृत्तीच्या विषयावर विचारले असता ते म्हणाले, पक्षाच्या कार्यकर्त्यांची एवढी तीव्र प्रतिक्रिया येईल असे मला वाटलेच नव्हते. त्यांच्याविषयीचा माझा जो अंदाज होता तो चुकला. दोन-तीन दिवसांनंतर त्यांची समजूत काढता येईल, असे मला वाटले होते. मात्र प्रत्यक्षात उलटेच घडले. राज्याच्या बाहेरही आसाम पासून केरळ पर्यंत अनेक नेत्यांचे फोन आले. तसेच अनेकांनी विचारणा केली, ती लक्षात घेता माझे बोलणे हे अत्यंत वेगळ्या पद्धतीने घेतले गेले असे माझ्या लक्षात आले. त्याचबरोबर देशाची गरज लक्षात घेता मी राजीनामा द्यायला नको, अशी जी मागणी करत आहेत त्यावरही मला पुन्हा विचार करायला भाग पाडले.