सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर इंदापूर तालुक्यातील अकोले गावचे मूळ रहिवासी पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरले आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये 2000 प्रतींची तिसरी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे.
दिगंबर दराडे यांनी या पुस्तकासाठी लंडन येथे जाऊन ऋषी सुनक यांच्या विविध व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. या पुस्तकाला युवक युवतींकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डिजिटल माध्यमांमुळे समोर आले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे जावई आहेत.
ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले, त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून गेली होती. एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो. अर्थात आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत. दिवस-रात्र मेहनत करत आहेत.
माय मिररचे मनोज अंबिके म्हणाले, ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत असून दोनच दिवसांमध्ये आम्ही दुसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याचाही आमचा संकल्प आहे.
ऋषी सुनक, ब्रिटन पंतप्रधान : मी ब्रिटिश नागरिक आहे. येथे माझे घर आहे. हा माझा देश आहे, परंतु माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी एक हिंदू आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे.