दिवंगत स्वातंत्र्यसैनिकाच्या नावाने इंदापुरात सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी..?आता बदनामी सहन करणार नाही.. ‘त्याच्या’ वर गुन्हा दाखल करा..! नागरिकांची इंदापूर पोलीस स्टेशनकडे तक्रार..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर शहरातील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक नारायणदास रामदास शहा यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या चारित्र्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून चिखलफेक करणाऱ्या,तसेच शहर व तालुक्यातील सामाजिक सलोखा बिघडवू पाहणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इंदापूर शहरातील नागरिकांनी केली आहे.
कोणाचे तरी तात्पुरते राजकारण चालावे म्हणून जर महान कार्य केलेल्या स्वातंत्र्यसैनिकाच्या पश्चात त्याची बदनामी केली जात असेल त्याच्या कुटुंबाला लक्ष केले जात असेल तर यापेक्षा दुर्दैवते कोणते असा प्रश्न देखील शहरातील जागरूक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात विविध क्षेत्रातील २० हून अधिक नागरिकांच्या सह्यांचे निवेदन बुधवारी (३ मे) इंदापूर पोलिसांना देण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शहा कुटुंबाला लक्ष्य केल्याने नागरिकांनी त्या पोस्ट टाकणाराचा बंदोबस्त करावा,त्याच्यावर कारवाई करावी, यासाठी नागरिकांनी स्वतः पुढे येऊन त्याच्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे.
दिवंगत नारायणदास रामदास शहा यांचे देशाच्या स्वातंत्र्यासह तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अमूल्य योगदान इंदापूरकर कदापि विसरू शकत नाहीत. मात्र विशिष्ट स्वार्थापोटी काही नतद्रष्ट मंडळी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर चिखलफेक करत आहेत. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबासाठी अपशब्द वापरून अपमानास्पद, घाणेरडे, विकृत व खोडसाळ मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात संबंधित आरोपींचा नामोल्लेख करण्यात आलेला नसला तरी, आरोपींनी सोशल मीडियावरून विविध ग्रुप्सवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टच्या स्क्रीन शॉट्स पुराव्यादाखल पोलिसांना देण्यात आले आहेत. सामाजिक सलोखा बिघडवू पाहणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यासह, फेसबुक च्या स्वच्छ इंदापूर सुंदर इंदापूर, इंदापूर नगरपरिषद महासंग्राम या सोशल मीडियावरील ग्रुप्सवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही इंदापूरकरांनी पोलिसांना केली आहे.