बारामती : महान्यूज लाईव्ह
शरद पवार यांनी त्यांच्या निवृतीचा निर्णय मागे घेतल्यानंतर अजित दादा पत्रकार परिषदेला कसे उपस्थित राहिले नाहीत, तसेच ते दिल्ली दौऱ्यावर गेले अशा प्रकारच्या कंड्या पिकवणाऱ्या प्रसारमाध्यमांना अजित पवार यांनी कात्रज चा घाट दाखवला.
आज रात्री उशिरापर्यंत मुंबई थांबल्यानंतर 6 मे रोजी दौंड आणि कर्जत दौऱ्यावर, 7 मे रोजी बारामती दौऱ्यावर आपण असल्याचे त्यांनी जाहीर केले तर 8 मे रोजी कोरेगाव सातारा, 9 मे रोजी फलटण व 10 मे रोजी उस्मानाबाद, 11 मे रोजी नाशिक तर 12 मे रोजी पुणे असा दौरा सुद्धा सांगून टाकला.
काल अजितदादांनी प्रसिद्ध पत्रक काढून कार्यकर्त्यांना आवाहन केले. शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या आग्रहानुसार घेतला असून, त्यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिकाधिक जबाबदारी उचलावी. एकजुटीने आणि अधिक काम करावे. साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत करावा असे आवाहन अजित पवार यांनी केले.
शरद पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहावे असा निवड समितीचा आग्रह होता. त्यामुळे निवड समितीने पवार यांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कुटुंब आहे. त्यामुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात मोठे यश संपादन करेल असे नमूद करत त्यांनी पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे स्वागत केले.
साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडी तसेच देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला या निर्णयाने बळ दिले आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली.
दरम्यान कालच शरद पवार यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता, माझ्या निर्णयाची अजितला माहिती होती असे सांगून शरद पवार यांनी अजित पवार यांच्या कथित वेगळ्या सुराचे समर्थन केले होते. केवळ अजित पवार यांना या सर्व निर्णयाची कल्पना आपण दिली होती. त्यामुळे कोणीही वेगळा अर्थ काढू नका असे आवाहन शरद पवार यांनी कालच केले होते.