मुंबई – महान्यूज लाईव्ह
लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचे प्रकाशन समारंभावेळी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा शरद पवार यांनी निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनाच्या ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती असे सांगत मी राज्यभरातील कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते यांच्या म्हणण्याचा अनादर करू शकत नाही, त्यामुळे माझा निर्णय मी मागे घेत असल्याचे पवार यांनी जाहीर केले. त्यानंतर राज्यभरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आज पत्रकार परीषद घेत ही माहिती दिली. ते म्हणाले, मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसामध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा, याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम व विश्वास असलेले कार्यकर्ते, असंख्य चाहते, यांनी संघटित होऊन एकमुखाने काहींनी प्रत्यक्ष भेटून आवाहन केले.
त्याबरोबरच देशभरातून विशेषतः महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी मागणी केली. लोक माझे सांगाती हेच माझ्या समाधानी, सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम व विश्वास यामुळे मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेले आवाहन तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्य बैठकीत त्यांनी घेतलेल्या निर्णयास की जो, माझ्यापर्यंत पोचविण्यात आला. या सर्वांचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा मान राखून मी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.
मी पुन्हा अध्यक्षपद स्विकारतो आहे आणि जरी तो स्विकारला, तरी संघटनेमध्ये कोणत्याही पदाची जबाबदारी स्विकारणारे उत्तराधिकारी निर्माण होणे अत्यावश्यक आहे. माझ्या कार्यकाळात पक्षामध्ये जी संघटना असो, नवी जबाबदारी सोपवणे, नवे नेतृत्व तयार करणे यासंदरप्भात सहकाऱ्यांचा विचार घेऊन नव्या जबाबदाऱ्या सोपविणे व नवे नेतृत्व तयार करणे यावर माझा भर असेल.
यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येय धोरणे जनमाणसापर्यंत पोचविण्यासाठी मी अधिक जोमाने काम करीन. आपण सातत्याने तीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यश, अपयशामध्ये सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझ्या संगती राहीलात, याबद्दल मी आपला कायमचा ऋणी राहील.
जयंत पाटील यांची प्रतिक्षा करीत होते, शरद पवार..
शरद पवार हे साडेपाच वाजता पत्रकार परीषद घेणार होते, मात्र त्यांनी काही काळ वाट पाहिली. जयंत पाटील हे येत आहेत, तोपर्यंत आपण थांबू असे ते म्हणाले आणि साऱ्यांनीच मग प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्षा केली.