एका ठिकाणी चोरांनी दाखविला कोयत्याचा धाक.. चोरीत ४ लाख ८० हजाराचे दागिने,मोबाईल लंपास..! चौघांविरुद्ध गुन्हा दाखल..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील उजनीच्या काठावरील कालठण नं.२ गावच्या हद्दीत काल गुरुवारी (दि.४) मध्यरात्रीनंतर दोन ठिकाणी जबरी चोरीचा प्रकार घडला. चोरांनी चोरी करताना एका ठिकाणी कोयत्याचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. दोन ठिकाणी केलेल्या या चोऱ्यांमध्ये तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांचे दागिने व २० हजार रुपयांचे मोबाईल फोन चोरीस गेल्याप्रकरणी काल रात्री उशीरा चौघांविरुध्द पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
या जबरी चोरीप्रकरणी मयुर नितीन भोसले (रा. कालठण नं.२) व त्याच्या तीन अनोळखी सहका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सागर नामदेव रेडके (वय ३० वर्षे, रा कालठण नं.२) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रात्री बारा ते पावणेएक वाजण्याच्या दरम्यान, जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटे कालठण नं.२ मध्ये रहाणा-या नवनाथ हरीदास मेटकरी यांच्या घरी गेले होते. आरोपींपैकी एकाने मेटकरी यांना कोयत्याचा धाक दाखवून घरातील पैसे व सोने चांदी दे नाहीतर, जीवानिशी मुकशील अशी धमकी दिली.
मात्र त्याच वेळी घरातील लोक जागे व्हायला लागल्याने त्यांनी मोबाईल चोरुन नेले. ही घटना मेटकरी यांनी फिर्यादी सागर रेडके यांना कळवली. ते घटनास्थळी गेले. यावेळी उपस्थित सर्वांनी चोरट्यांची शोधाशोध केली. मात्र कोणी सापडले नाही. त्यानंतर फिर्यादी सागर रेडके हे २ वाजून २० मिनिटांच्या सुमारास आपल्या घरी गेले.
त्यावेळी त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले दिसले. दरम्यान आडोशाला लपून बसलेला आरोपी मयुर भोसले पळून जाताना दिसला. सागर रेडके यांनी घरात जावून पाहणी केली असता, त्यांना घरातील एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचे दागिने पळवून नेल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.