शिरूर – महान्यूज लाईव्ह
दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात शिरूरकर मैदानात उतरले असून शनिवारी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उमेश शेळके यांनी दिली.
दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा नुकताच टीडीएम हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये सिनेमास गर्दी असून ही प्राईम टाईम शो देण्यास अनेक थिएटर मालकांनी नकार दिला.
याविरोधात भाऊराव कऱ्हाडे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसेच राज्यातील अनेक शो थांबवले होते. भाऊराव कऱ्हाडे यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात शिरूरकरांनी मोर्चाचे आयोजन केले असून शनिवारी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे.
ही माहिती उमेश शेळके यांनी दिली. ग्रामीण भागातील दिग्दर्शक म्हणून भाऊराव कऱ्हाडे हे ओळखले जात असून शिरूर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या शिरूर भागात भाऊराव यांचा मोठा जनसंपर्क आहे.
त्यांच्या एका सिनेमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन ही त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज आवाज उठविण्यासाठी तसेच त्यांना समर्थन म्हणून आम्ही शिरूर शहरातील सर्व मित्र परिवाराच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन केले जात असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेला उमेश शेळके, रुपेश घाटगे, अविनाश घोगरे, योगेश महाजन, अनघा पाठक, रेश्मा शेख, बाबुराव पाचंगे, नितीन अवचर आदी उपस्थित होते.
दरम्यान तीन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील भाऊराव कऱ्हाडे यांच्या चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नाहीत म्हणून चिंता व्यक्त करत संबंधितांना थेटर उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केली होती. त्यानंतर राज्यात देखील सर्वत्र संतापाची लाट उसळली. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार यांच्या ट्विटनंतर काही चित्रपट गृह मालकांनी या संदर्भात तयारी दर्शवली.