दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत देण्यात येणारा २०२१-२२ चा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मांढरदेव गावचे सुपुत्र शंकर दौलतराव मांढरे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मुंबई येथे होणार आहे.
मांढरे हे वाई येथील गरवारे टेक्नीकल फायबर्स लिमिटेड या कंपनीमध्ये सन १९९५ पासून मशीन ऑपरेटर या पदावर कार्यरत आहेत. ते स्वतःचे नेमून दिलेले काम करत असतानाच कामगार संघटनेच्या विविध पदावर गेली २० वर्षापासून कार्यरत आहेत. या कालावधीत कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यामध्ये दुवा साधन्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.
कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात होणाऱ्या पगारवाढीचे अॅग्रीमेंट करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम राबवून त्यांचा सहका-यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. हे करीत असताना वाई एम.आय.डी.सी.मध्ये जागा घेऊन तेथे सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून कामगारांसाठी घरे बांधली.
कंपनीच्या मल्टीस्किल्ड धोरणानुसार विविध विभागात काम केले. कामगारांना वाहन चालविण्याचा परवाना मिळावा याकरिता वाई एम.आय. डी.सी.मध्ये RTO शिबीर घेतले. दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट वाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, कंपनीचे उत्पादनवाढीसाठी गटचर्चा, सल्ला व सूचना प्रभावीपणे राबविल्या.
मांढरे हे मांढरदेव ग्रामपंचायतीचे 5 वर्षे सदस्य व 5 वर्षे उपसरपंच या पदावर कार्यरत होते. या कालावधीत गावच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडली. आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी गावात विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असताना शाळेमध्ये लोकसहभागातून शाळेच्या मैदानाची डागडुजी केली.
शाळेकरिता बोअरवेल काढली, वृक्षारोपण केले, मेळावे घेतले. मांढरदेव यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाबरोबर काम केले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून सार्वजनिक बोअरवेल व शिवकालीन विहीरी मंजूर होण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केले.
ते शंभू महादेव पतसंस्था मांढरदेव या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही शासनाने नेमणूक केली आहे.
सन २०१५ चा सातारा जिल्हा आदर्श पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. वाई तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती. अशा विविध संस्थांच्या पदावर कार्यरत असणारे शंकर दौलतराव मांढरे यांना कामगार क्षेत्रातील मानाचा तुरा असलेला राज्यस्तरीय गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर झाला आहे.
याबद्दल गरवारे टेक्नीकल फायबर्स लिमिटेड कंपनीचे वरीष्ठ व्यवस्थापकीय अधिकारी विवेक कुलकर्णी, मोहन मोने, प्रबोध कामत साहेब, अरविंद कुलकर्णी, श्री वैभव जोशी, नवनाथ सुर्यवंशी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, किसनवीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, वाई तालुका सुतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ, मोहन जाधव यांच्यासह मांढरदेव गावचे ग्रामस्थ व गरवारे टेक्नीकल फायबर्स लिमिटेडच्या कामगार संघटनेचे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.