सोलापूर : महान्यूज लाईव्ह
आज पहाटे पुणे सोलापूर महामार्गावर घडलेल्या दुर्घटनेत तिघा मित्रांचा जीव गेला. पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघेजण जागीच ठार झाले तर तिसरा गंभीर जखमी झाला होता. त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे तिघेही पुण्यात काम करत होते, तिघेही सोलापूरचे एकाच भागातील होते.
मृतामध्ये तिघेही सोलापूर शहरातील भवानी पेठ येथे राहणारे असून गणेश शरणप्पा शेरी, लिंगराज शिवनंद हडके व तेजस सुरेश इंडी अशी त्यांची नावे आहेत. वीस ते २३ वयोगटातील हे तिघेजण त्यांच्या मित्राची दुचाकी घेऊन पुण्याच्या दिशेने निघाले होते. पुणे सोलापूर हायवेवर माढा तालुक्यातील अरण गावच्या हद्दीत आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
नातेवाईकाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून हे तिघेजण पुण्याकडे निघाले होते. तेजस व लिंगराज या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आले, मात्र त्याची अवस्था गंभीर असल्याने त्याला लगेचच सोलापुरातील सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रात्रीच्या वेळी महामार्गावरून दुचाकी वर तिघेजण जात असताना त्यांना कोणी नातेवाईकांनी सूचना देणे आवश्यक होते, कारण रात्रीच्या वेळी अनेक वाहन चालक हे अंदाजाने कधीकधी गाडी चालवतात. या तिघांच्या जाण्याने एकाच वेळी तीन घरी दुःखाची छाया पसरली आहे.