पुणे सोलापूर महामार्गावर पळसदेव जवळील काळेवाडी नं.२ येथे अज्ञात वाहनाची नर जातीच्या बिबट्याला धडक .. बिबट्या जागीच ठार ..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पुणे सोलापूर महामार्गवर इंदापूर तालुक्यातील पळसदेव नजीक मंगळवारी (दि.०२ मे) रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे 3 ते 4 वर्षे वयाच्या नर जातीच्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना इंदापूर तालुक्यातील काळेवाडी नंबर 1 व काळेवाडी नंबर 2 याच्या दरम्यान सोलापूर पुणे लेनवर घडली आहे. जरी बिबट्या ठार झाला असला तरी इंदापूर तालुक्यात बिबट्याच्या झालेल्या शिरकावाने उजनीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे सावट दिसून आले आहे.
बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास बिबट्या ठार झाल्याचे समजताच इंदापूर वन परिक्षेत्र अधिकारी अजित सुर्यवंशी, वनपाल गावटे, वनरक्षक सनी कांबळे, वनमजूर महादेव झोळ यांसह महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड, पोलीस हवालदार उमेश लोणकर, पोलीस हवालदार भानुदास जगदाळे, पोलीस नाईक नितीन वाघ यांनी अपघात स्थळी भेट दिली.मृत बिबट्याचा पंचनामा केला असून मृत बिबट्याचे शव वन विभागाने पुढील तजविज कामी ताब्यात घेतले आहे.
मयत बिबट्याचे शवविच्छेदन करुन नियमानुसार अंत्यसंस्कार केले जातील, शिवाय बिबट्या मृत्यूप्रकरणी अज्ञात वाहन व अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला जाईल असं वन परिक्षेत्र अधिकारी अजित सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.
इंदापूर तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचे अनेक वेळा शेतकऱ्यांमधून बोलले जात होते. हा बिबट्या जरी अन्नाच्या शोधात इंदापूर तालुक्यात चुकून आलेला असला तरी यापूर्वी अनेक वेळा बिबट्या या भागातून गेल्याची माहिती या निमित्ताने समोर येत आहे. यापूर्वी करेवाडी, चितळकरवाडी या भागात बिबट्या पाहिल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले होते.
तसेच याच महामार्गावर इंदापूर तालुक्यातच बिबट्याने महामार्ग ओलांडताना वाहन चालकांनी पाहिले होते. एका वाहन चालकाने आपल्या वाहनातून मोबाईल वरून प्रवासाचा व्हिडिओ काढत असताना अचानक त्याला बिबट्या रस्ता ओलांडताना मोबाईलमध्ये चित्रित झाला होता. वनविभागानेही यापूर्वी अन्नाच्या शोधात एक बिबट्या येऊन गेल्याच्या विषयावर दुजोरा दिला होता. मात्र काही झाले तरी इंदापूरच्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रात बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे. यामुळे शेतकरी मात्र चिंतातूर होताना दिसत आहे.