शेखर पासेकर, पुणे
अनेक वादळ अंगावर घेऊन ऊन वारा पावसात तो उभा आहे. डोंगराआड आडोशाला असणारी लोक आज सैरभैर झालीत. वटवृक्ष म्हटले की त्याच्या मुळाशी असणाऱ्या छोट्या वृक्षांना नेहमी वाटते मी पण कधी होईल मोठा? आणि मग मुसळधार पावसाला सुरवात झाली की वटवृक्ष आपसूकच त्या पालवी फुटलेल्या रोपांना आपल्या विशाल फांद्या खाली घेतो.
आज राष्ट्रवादीचे तसेच झालंय. कोणी रडतय, कोणी शांत झालंय, कोणी संभ्रमित झालय. मला वाटते कार्यकर्ते आणि नेत्यांनी आता नवीन नेतृत्वाखाली वाटचाल करायची वेळ आली आहे. अगदी स्पष्टपणे सांगतो आहे, तुमचे जर शरद पवार या माणसावर प्रेम असेल, तर तुम्ही ठरवा की, आता छोट्या छोट्या अडचणींकरता मी सिल्व्हर ओकवर जाणार नाही.
थोडे नाही रे, 80 च्या पुढे पोहोचलेयत साहेब. तरुणांना लाजवेल अशी कामे करता असे म्हणून किती त्रास देत आहात तुम्ही? शेवटी मर्यादा आहे प्रत्येकाला.. दौरे, धावपळ, जागरण, प्रवास, उदघाटन, सामाजिक संस्थाची निमंत्रणे त्यात वार्धक्यात वेळेवर घ्यावी लागणारी औषधे, त्यांचे पथ्य पाणी हे कधीतरी कुठेतरी, केव्हातरी थांबायला हवे याचा विचार करेल कोण?
घरात 70 / 75 च्या आई वडलांना आपण रागावून सांगतो, की बाहेर जाऊ नका.. आभाळ भरून आलंय घरी बसा. आजारी पडायचेय का? मग पावसात भिजायला तुम्हाला पवार साहेब कसे लागतात? साहेबांच्या हयातीत जर दुसरे नेतृत्व उदयास येत असेल तर काय वाईट आहे? चुकले माकले तर साहेब आहेतच ना?
अतिशय स्तुत्य आणि योग्य निर्णय साहेबांनी घेतला आहे. मला खरे तर धावपळ करणाऱ्या साहेबांपेक्षा घरच्या लॉबीत खुर्चीवर बसून शांतपणे गाणे ऐकणारा बुद्धिबळ खेळणारा माणूस जास्त आवडतो. त्यांना आता मनासारखे जगू द्या रे.. त्यांनी असाच आराम करावा. बघा तुम्हाला पटतंय का ?