मुंबई : महान्यूज लाईव्ह
लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आज सर्वजण जमलेले असताना शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. तीन वर्ष अजून खासदारकीची शिल्लक असतानाच शरद पवार यांनी अचानक हा निर्णय जाहीर केला. कोठे थांबायचे हे मला माहिती असल्याने पुढील फक्त तीन वर्ष केंद्र आणि राज्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि व्यासपीठावर अचानक गोंधळ उडाला.
आपण केंद्र आणि राज्याच्या प्रश्नावर लक्ष घालणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले, मात्र अचानक त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेणार असल्याचे सांगताच सगळीकडे गोंधळ उडाला. व्यासपीठावर कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि कार्यकर्ते भावूक झाले. प्रतिभा पवार देखील यावेळी व्यासपीठावर होत्या. त्या देखील भावूक झाल्या.
पवार यांनी अचानक जाहीर केलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा सन 2019 मधील ईडीच्या कार्यालयावर पवार यांनी जाण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी झालेली परिस्थिती आज निर्माण झाल्याचे दिसत होते. कारण भाऊ कार्यकर्त्यांनी लगेचच आमचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणा देण्यास सुरुवात केली आणि एकच वातावरण तयार झाले.
दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. साहेब बोलणार असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम पुन्हा सुरू ठेवण्याची सूचना देखील केली.
पक्षातील पुढील निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची देखील त्यांनी घोषणा केली. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटिल, सुप्रिया सुळे, राजेश टोपे, जयदेव गायकवाड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या समितीने नवा नेता निवड करावी, अशी सूचना त्यांनी केली. मात्र या निर्णयानंतर जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले, तर धनंजय मुंडे देखील शरद पवार यांच्या पाया पडत हा निर्णय मागे घेण्याची विनवणी करत होते.