राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी २६ एप्रिल रोजी जाहीर केल्यानंतर आज १ मे रोजी खरंच भीमा पाटस कारखान्यावर कथित भष्टाचाराचे पुरावे घेऊन आले, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकाकांच्या पुतळ्यासमोर एक तास बसले, पण ना भाजप आमदार आणि कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल तिकडे फिरकले, ना कारखान्याचे अधिकारी.. ना आमदार कुल यांचे समर्थक फिरकले.
भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींचा कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून मागील काही महिन्यांपासून भीमा पाटस कारखाना चर्चेत आहे. खासदार संजय राऊत यांनी तर दौंड तालुक्यातील वरवंड येथे आमदार कुल यांनी पाचशे कोटींच्या भ्रष्टाचाराची पोलखोल सभा घेऊन कुल यांच्यावर टीका केली होती.
याच पोलखोल सभेत भाजपचेच माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी संचालक नामदेव ताकवणे यांनी आमदार राहुल कुल यांना तुम्ही पारदर्शक कारभार केला आहे आणि भ्रष्टाचार केला नाही हे सिद्ध करून दाखवा, मी एक मे रोजी भीमा पाटस कारखान्यावर भ्रष्टाचाराचे पुरावे कागदपत्रांसह घेऊन येतो, मधुकाकांच्या पुतळ्यासमोर बसतो. तुम्ही भ्रष्टाचार केला नाही हे सिद्ध करून दाखवा, माझे जर खोटं निघाले, तर मी तुमच्या घरी वर्षभर धुणीभांडी घासायला येतो असे खुले आव्हान राहुल कुल यांना या सभेत दिले होते.
त्यानुसार सोमवारी एक मे कामगार आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आणि दिलेल्या आव्हानानुसार नामदेव ताकवणे हे भीमा पाटस कारखान्यावर अकरा वाजता आले. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकाका शितोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून ते एक तास याठिकाणी बसले, मात्र या कालावधीत कारखान्याचे कोणीही पदाधिकारी आले नाहीत.
यावेळी बोलताना ताकवणे म्हणाले की, तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या भ्रष्टाचाराचे सर्व ठोस पुरावे मी घेऊन आलो आहे. त्यांना सभासदांच्या समोर भर सभेत खुले आव्हानही दिले होते. मात्र ते आले नाही आणि त्यांचा कोणताही प्रतिनिधी ही आला नाही, यावरून कुल यांनी भ्रष्टाचार केला का नाही सिद्ध होत आहे. त्यांनी किती पारदर्शक कारभार केला आहे हे या भ्रष्टाचाराच्या पुराव्यावरून सिद्ध होत आहे.
त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, ते चर्चेसाठी का आले नाहीत? पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला होता. मात्र त्यांनी अशी चर्चा आहे असे सांगून यावर उत्तर देण्याचे टाळले. मात्र पुन्हा मी आमदार कुल यांना १५ मेपर्यंत चर्चेसाठी वेळ देतो, पुन्हा या ठिकाणी येऊन खुले चर्चेच आव्हान करतो, ते जर आले नाहीत तर मी १५ मे नंतर सभासदांच्या घरी जाऊन हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचतो. असे इशारा आणि आव्हान ही ताकवणे यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी प्रल्हाद फडके, मल्हारी बोत्रे, हनुमंत बोत्रे, शांताराम बांदल मिथुन शितोळे, तुकाराम शितोळे, प्रमोद मोरे,विकास सोनवणे माणिकराव खारतुडे, रवींद्र ताकवणे, आबासाहेब ताकवणे आदी उपस्थित होते.