भिगवण : महान्यूज लाईव्ह
भिगवण नजीकच्या शेटफळगढे परिसरात अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीने आत्महत्या केली.
जानेवारी 2023 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत शेटफळगढे परिसरातील एका वीटभट्टीच्या ठिकाणी वेळोवेळी हा अत्याचार झाला. याप्रकरणी अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार (वय 45 वर्ष रा. शेटफळगडे ता. इंदापूर) व रमेश रघुनाथ मोरे (वय 35 वर्ष रा. शेटफळगडे ता. इंदापूर) या दोघांवर पोलिसांनी पोस्को कायद्यासह अॅट्रोसिटी दाखल केली होती. यातील कुंभार याने आत्महत्या केली.
कुंभार याने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली. कुंभार याने या संदर्भात एक चिठ्ठी देखील लिहून ठेवल्याची चर्चा येथील ग्रामस्थांमध्ये आहे. अर्जुन रामभाऊ कुंभार याने शेटफळगढे गावातील कालव्याजवळ किरण वडूजकर यांच्या शेतात चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेतला.
14 वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. भिगवण पोलिसांनी याप्रकरणी वीटभट्टी मालकासह दोघांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. यातील एकास पोलिसांनी अटक केली होती, तर एकजण फरार होता.
याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 14 वर्ष वयाच्या मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जर शारीरिक संबंध प्रस्थापित करू दिले नाहीत, तर तुझ्या वडिलांकडे तुझी बदनामी करू अशी धमकी देत वेळोवेळी या दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. यातून ही मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील एकास अटक केली. तर कुंभार याने आत्महत्या केली. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.