दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील धोम डाव्या कालव्याला पांडे गावातील चंद्रभागेच्या ओढ्यावर गेल्या वर्षभरापासून पाण्याची गळती होत आहे, मात्र याकडे जलसंपदा खात्याचे दुर्लक्ष आहे. हे असेच वाढत राहिल्यास त्या ठिकाणी कालव्याला भगदाड पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या गळतीमुळे कालव्यातून लाखो लिटर पाणी दर दिवशी ओढ्यात वाहून जाते. धोम पाटबंधारे विभागाचे आजपर्यंत लाखो रुपयांचे नुकसान यातून होत असल्याने पांडे गावासह तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम भागात धोम धरण आहे. या धरणाला उजवे आणि डावे असे दोन कालवे आहेत.
त्या पैकी डावा कालवा हा १६६ किलोमीटर लांबीचा आहे. या कालव्याव्दारे वाई, खानापुर, ओझर्डे, जोशीविहीर, अनवडी, देगाव, किकली,लिंब, गोवे मार्गे सातारा येथून रहिमतपूरकडे पाणी जाते. या पाण्यावर शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती भिजत असते. मुबलक पाणी मिळत असल्याने शेतकरीही शेतात जास्तीत जास्त पैसे देणारी पिके घेत असतात.
यापासून धोम पाटबंधारे विभागाला पाणी पट्टीच्या
रुपाने दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असते. या १६६ किलोमीटर लांबीच्या कालव्याला वितरिका आहेत. त्यातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी जागोजागी लोखंडी दरवाजे आहेत. या दरवाजातूनही गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरु असल्याने दररोज लाखो लिटर पाणी ओढ्यात वाया जात आहे.
त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याचे भान सातारा येथील धोम पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नसल्याने धोम पाटबंधारे विभागाची आज दयनीय अवस्था झाली आहे. या डाव्या कालव्यावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळती असताना देखील त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे हा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानेच काही वेळा कालवे फुटून शेतकऱ्यांच्या पिकासह जमिनी
वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याच्या नोंदी महसूल. पोलिस स्टेशन व धोम पाटबंधारे विभागात आढळून येतात.
एखाद्या शेतकऱ्याने चोरून पाणी आपल्या शेतात नेले, तर त्याचा तात्काळ पंचनामा करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन मनमानी रक्कम वसूल करतात .मग
धोम प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जर दिवसाला लाखो लिटर पाणी ओढ्यात वाया जात असेल, तर त्या नुकसानीची रक्कम राज्य सरकारने कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांच्या पगारातून सक्तीने वसुल करावी अशी मागणी वाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.