राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : गेली वीस – पंचवीस वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीच्या अहंकारी नेत्यांना मतदारांनी घरी बसवले. ९ जागांवर विजयामुळे समाधानी असलेले आमदार राहुल कुल यांची राष्ट्रवादीवर टीका तर माजी आमदार रमेश थोरात म्हणाले मतदारांनी दिलेला कौल मान्य!
राष्ट्रवादीतील नाराज उमेदवारांमुळे ९ जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व काटे की टक्कर अशा झालेल्या लढतीत दौंड भाजप आमदार राहुल कुल यांच्याकडे ९ तर माजी आमदार रमेश थोरात यांच्या राष्ट्रवादीकडे ९ अशी समान मतदारांनी कौल देत कुल – थोरात यांनी जास्त हवेत खेळू नका, जागेवरच खेळा असा संदेश या निवडणुकीच्या निमित्ताने एकप्रकारे दिला आहे.
मागील वीस – पंचवीस वर्षापासून दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात माजी आमदार रमेश थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र २०२३ च्या या निवडणुकीत भाजप आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने कंबर कसली होती.
कृषी उत्पन्न बाजार समिती कोणत्याही परिस्थितीत काबीज करायची याच उद्देशाने आमदार कुल हे निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरले होते आणि अखेर मतदारांनी दिलेला कौल मतमोजणीनंतर चित्र स्पष्टच झाले. मागील वीस पंचवीस वर्ष दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपलेच वर्चस्व असल्यामुळे निवडणुकीतही कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा आपल्याच ताब्यात येईल असा समज करून हवेत गेलेली राष्ट्रवादी मतमोजणी सुरू झाल्यानंतर अगदी जागेवर आली.
मतमोजणीनंतर दौंड भाजपचे आमदार राहुल म्हणाले, मतदारांनी अहंकारी असलेल्या राष्ट्रवादीचा पराभव केला. सोसायटीच्या सर्व जागा आम्हीच जिंकू अशा म्हणणाऱ्या राष्ट्रवादीला मतदारांनी घरी बसवले, मतमोजणी निकालानंतर त्यांना तोंड लपवून घरी जाण्याची वेळ आली. कालावधी कमी असतानाही नऊ जागेवर आम्हाला विजय मिळाला तरी आम्ही समाधानी आहोत.
चिठ्ठ्या मधून आम्ही दौंड नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणूकीत सत्ता मिळवली होती. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणूकीतही आम्ही आशावादी आहोत.
तर मतमोजणी निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार रमेश थोरात म्हणाले की, जनतेनी दिलेला कौल मान्य आहे, मागील वीस- पंचवीस वर्षापासून बाजार समितीवर आमची सत्ता होती. यावेळी आमच्याकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त होती, परंतु १८ उमेदवारांना संधी देणे गरजेचे होते. त्यामुळे इच्छुक असलेले इतर उमेदवारांना माघार घ्यावी लागल्याने ते नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यास आम्हाला उशीर झाला. या नाराजीमुळे आमचा ९ जागेवर पराभव झाला.