बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती बाजार समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलने भाजपच्या पॅनलला धूळ चारत एकतर्फी वर्चस्व मिळवले. सर्वच्या सर्व जागा जिंकत बारामती मध्ये राष्ट्रवादीने पुन्हा वर्चस्व अधोरेखित केले आहे. बारामतीतील मतमोजणी रयत भवन येथे झाली.
इंदापूर बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज उशिरा सुरू झाली असून सध्या मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत अप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने अगोदरच चार जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. उर्वरित 13 जागांसाठी निवडणूक झाली. त्याची मतमोजणी सुरू असून हाती आलेल्या माहितीनुसार जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत.
दौंडमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार राहुल कुल यांनी राष्ट्रवादीला दणका दिला असून ग्रामपंचायतीच्या प्रवर्गात राहुल कुल यांची जादू चालली तर सोसायटी प्रवर्गात देखील चुरशीची लढत असून सध्या मतमोजणी सुरू आहे. ही बाजार समिती मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने जिंकली होती.