दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
ही घटना दोन दिवसांपूर्वीची.. मीच त्याला साक्षीदार.. एक पत्रकार असलो तरी सामाजिक संवेदनशीलता आम्हाला जपावीच लागते म्हणण्यापेक्षा ती हाडामासात रुतलेल्या लोकांनाच पत्रकारिता करता येते.. पसरणीच्या घाटात एका टॅंकरने माकडाला जोराची धडक दिली यात माकड गंभीर जखमी झाले आणि टँकर चालक देखील जखमी झाला..
टँकरचालक जखमी आणि वानरही जखमी.. मग माझ्यातील पत्रकारिता जागी झाली नाही तरच नवल.. तातडीने वन विभागाला कॉल करून याची माहिती दिली. या जखमी वानरासाठी गाडी पाठवावी अथवा कर्मचारी पाठवावा अशी विनंती केली. दरम्यान टँकर चालकाला रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था तर झाली पण वनविभागाकडून काही रिप्लाय येईना.
तब्बल दोन तास वन विभागाची गाडी आली नाही आणि कर्मचारी देखील आला नाही. अखेर पसरणी येथील दोन मुले मात्र ही सगळी परिस्थिती लांबून पाहत होती, आणि ती धावत पळत आली. एक होता जय विनोद शेलार हा तेरा वर्षांचा मुलगा! तर दुसरा होता समर्थ संदीप शिंदे हा सोळा वर्षाचा मुलगा! दोघेही नवाब बंगला या ठिकाणी राहतात.
या दोघांनी आपणच या वानराला दवाखान्यात नेऊ असे सांगितले. खरे तर लहान मुलंच काय, मोठी माणसं देखील वानराच्या जवळ जायला घाबरतात, पण या दोन मुलांनी धाडस दाखवले आणि वानराला घेऊन आम्ही तिघेजण दवाखान्यात पोहोचलो. या प्रकाराची माहिती ज्यावेळेस इतरांना समजली, तेव्हा मात्र या दोघांचं खूप कौतुक झाले. कारण या लहान मुलांकडे जी संवेदनशीलता आहे, ती त्या दिवशी वन विभागाकडून पाहायला मिळाली नाही. मात्र माणुसकी ही लहान मुलात किती तत्पर असते याचा मात्र प्रत्यय नक्कीच आला.
जय विनोद शेलार वय १३ आणी समर्थ संदीप शिंदे वय १६ दोघेही राहणार नवाब बंगला या दोघांनी पत्रकार दौलतराव पिसाळ यांना दुचाकीवरुन जखमी वानराला उपचारासाठी दवाखान्यात नेहण्यासाठी केलेल्या मदती मुळे या लहान मुलांचे पक्षी प्रेमी आणी वाई पाचगणी महाबळेश्वर परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे .