दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : चिखली (ता.वाई) येथील तंटामुक्त समितीचे पदाधिकारी व त्यांच्या साथीदारांनी मोरजीवाडा येथील वयोवृद्ध दांपत्यास धक्काबुक्की केल्यावरून मोरजीवाडा येथील लोकांनी वाई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
मोरजीवाडा येथील रहिवासी दत्तात्रय सदाशिव वाडकर
यांच्या घरात घुसून त्यांचे वयोवृद्ध आई, वडील व पत्नी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व तुमचा सिध्देश कुठे आहे, त्याला जास्त मस्ती आली आहे, त्याची मस्ती ऊतरवतो, हात पाय तोडून त्याला जिवे मारतो अशी धमकी दिली व घरातील साहित्याची नासधूस करत साहित्य फेकून दिले.
या कृत्यामुळे महिला, पुरुष, तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ मोरजीवाडा येथील ३०० महिला व पुरूषांनी एकत्रित येऊन बापुसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वाई पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.
सहाय्यक फौजदार स्नेहल सोमदे, हवालदार मुजावर यांना निवेदन देऊन चिखलीच्या तंटामुक्त अध्यक्षावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संतप्त जमावाने या वेळी केली. वाई मध्ये शिक्षणासाठी जात असलेल्या मुलामुलींना काही टवाळ मुले त्रास देतात. यावरून हेतू पुरस्सर वातावरण तयार करून याला वेगळे वळण दिले जात आहे. मोरजीवाडा हे धोम धरणाचे प्रकल्पामध्ये झळ बसलेल्या गावांपैकी एक गाव असून, आम्ही उदरनिर्वाहासाठी वाई शहर, मुंबई व तसेच भारतातील इतर ठिकाणी उदर निर्वाहासाठी जात असतो.
आमची मुले वाई येथे शिक्षणासाठी दररोज एस.टी.ने येत असतात. शिक्षणासाठी येत असताना संबंधित गावातील काही टवाळ वृत्तीची मुले गाडीतील मुले व मुलींना वारंवार त्रास देत असतात. अशा टवाळ वृत्तीच्या मुलांनी त्रास देण्याच्या हेतूने आमचे येथील युवकांना २३ एप्रिल २०२३ रोजी किरकोळ भांडणाचे वातावरण हेतूपरसर तयार केले आणि त्यावरून वरील प्रकार घडल्याचा दावा संबंधित ग्रामस्थांनी केला आहे.