भिगवण : महान्यूज लाईव्ह
भिगवण नजीकच्या परिसरात अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केला. यामध्ये संबंधित 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. भिगवण पोलिसांनी याप्रकरणी वीटभट्टी मालकासह दोघांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. यातील एका नराधमास पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी जानेवारी 2023 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत शेटफळगडे परिसरातील एका वीटभट्टीच्या ठिकाणी वेळोवेळी हा अत्याचार झाला. याप्रकरणी अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार (वय 45 वर्ष रा. शेटफळगडे ता. इंदापूर) व रमेश रघुनाथ मोरे (वय 35 वर्ष रा. शेटफळगडे ता. इंदापूर) या दोघांवर पोलिसांनी पोस्को कायद्यासह अट्रोसिटी दाखल केली आहे. आरोपींपैकी एक जण या गावचा माजी उपसरपंच असल्याचे सांगितले जात आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी सदरची अल्पवयीन मुलगी 14 वर्ष वयाची असताना देखील तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जर शारीरिक संबंध प्रस्थापित करू दिले नाहीत, तर तुझ्या वडिलांकडे तुझी बदनामी करू अशी धमकी देत वेळोवेळी या दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. यातून ही मुलगी दोन महिन्याची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या संतापजनक घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील एकास अटक केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.